मुंबई - विद्यापीठ अनुदान आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्देशांनुसार वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या रॅगिंगविरोध कमिटी अधिक बळकट करण्यात येतील. तसेच दर दोन महिन्यांनी आलेल्या तक्रारींचा आढावा घेण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सभागृहाला दिले.
बा. य. ल. नायर रुग्णालयातील टोपीवाला महाविद्यालयात डॉ. पायल तडवी या डॉक्टर विद्यार्थिनीने केलेल्या आत्महत्येप्रकरणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महासभेत केलेल्या निवेदनाला आणि त्याला राखी जाधव, रईस शेख, अभिजीत सामंत यांनी दिलेल्या समर्थनाला आयुक्त उत्तर देत होते.
रवी राजा म्हणाले की, डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येमुळे मुंबईकरांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. गेल्या वर्षभरातील दुर्दैवी घटनांमुळे नायर रुग्णालयाच्या लौकिकाला काळीमा फासला गेला आहे. त्याला नायरच्या अधिष्ठात्यांचा ढिसाळ कारभार कारणीभूत आहे. या प्रकरणात अधिष्ठाता आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि त्याचा अहवाल सभागृहापुढे ठेवण्यात यावा.
राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी रुग्णालयाच्या प्रशासकीय खात्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून असाच मानसिक छळ होत असल्याचे आणि निवासी डॉक्टर अधिकाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचे निदर्शनास आणले. भाजपचे अभिजीत सामंत यांनी तर या प्रकरणात गुन्हेगारांना पाठी घालण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. या प्रकरणी सहाय्यक अधिष्ठाता, संयुक्त मुख्य पर्सनल ऑफिसर यांना निलंबित करून त्यांचा चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली.
सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन आयुक्त प्रवीणसिंग परदेशी यांनी संबंधित डॉक्टरांना निलंबित करण्यात येईल असे सांगितले. तसेच या प्रकरणात पोलीस कारवाई सुरू असून युनिव्हर्सिटी नियम अधिक बळकट करण्यात येतील, असे सांगितले. त्याचबरोबर विद्यापीठ अनुदान आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्देशांनुसार वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या रॅगिंगविरोधी कमिटी अधिक बळकट करण्यात येतील. तसेच दर दोन महिन्यांनी आलेल्या तक्रारींचा आढावा घेण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन दिले.