मान्सूनसाठी महापालिका सज्ज - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 May 2019

मान्सूनसाठी महापालिका सज्ज


मुंबई - यंदाचा पावसाळा हा सर्व मुंबईकरांना कोणत्याही आपत्तीपासून त्रास न होता त्यांचे दैनंदिन जनजीवन सुरळीत रहावे यासाठी बहन्मुंबई महापालिका प्रशासनासह सर्व मुंबईतील यंत्रणांनी योग्य तो समन्वय साधून मान्सून पूर्व कामे करावीत असे निर्देश महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी मान्सूनपूर्व विविध कामांच्या आढावा बैठकीत सर्व यंत्रणांना दिले.

महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयात आज विविध यंत्रणांच्या वरिष्ठ अधिका-यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पोलीस आयुक्त संजय बर्वे, मध्य रेल्वेचे विभागीय रेल प्रबधंक एस.के.जैन, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपगनरे) विजय सिंघल, अतिरिक्‍त महापालिका आयुक्त (शहर), ए.एल. जऱहाड, अतिरिक्‍त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. अश्विनी जोशी, ‘बेस्ट’चे उप महाव्यवस्थापक आर. जे. सिंग तसेच म्हाडा, एम.एम.आर.डी.ए., भारतीय नौदल, भारतीय लष्कर, पश्चिम व मध्य रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभाग, हवामान खाते, विमानतळ प्राधिकारी जिल्हाधिकारी, मुंबई शहर व उपनगरे / नागरी संरक्षण दल, राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद पथक, तसेच महापालिकेचे सर्व सह आयुक्त, उप आयुक्त, खाते प्रमुख व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत प्रामुख्याने धोकादायक इमारती, दरडी कोसळण्याची संभाव्य ठिकाणी विशेष काळजी घ्यावी असे आदेश परदेशी यांनी दिले. उपनगरीय रेल्वे वाहतूक सुरळीत सुरु रहावी, पावसाळ्यात जनजीवन विस्कळीत होऊ नये म्हणून रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत राहील याची काळजी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी सर्व यंत्राणांना दिल्या. मे अखेर पर्यंत रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी प्रत्येक परिमंडळनिहाय नियोजन करावे. दरडी कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणांची विशेष काळजी घ्यावी. तेथे राहणाऱया नागरिकांत जनजागृती व्हावी म्हणून उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच म्हाडा व जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधून संरक्षक भिंती व जाळ्या बसवाव्यात. सर्व २४ प्रशासकीय विभागातील संभाव्य पाणी साचण्याच्या ठिकाणी पाण्याचा उपसा करणा-या पंपांची व्यवस्था करावी. चौपाटय़ांवर ९३ जीवरक्षक नेमण्यात आले असून बीच सेफ्टीसाठी जेट स्की, पॉवरबोट उपलब्ध करण्यात आल्या आहेत. भारतीय नौदल, भारतीय लष्कर, भारतीय तटरक्षक दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल यांना आपत्कालीन परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी सर्व-त्या सामुग्री व साधनांसह कार्यान्वित करण्यासाठी समन्वय साधण्याचे निर्देश दिले.

३९८ अतिधोकादायक इमारती -
मुंबईत असलेल्या अति धोकादायक ३९८ इमारतींपैकी घाटकोपरमध्ये ६४, अंधेरी व जोगेश्वरी पश्चिममध्ये ५१ व मुलुंडमध्ये ४७ इमारती असून यापैकी १९३ इमारतींची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. ४६ इमारती तांत्रिक सल्लागार समितीच्या अंतर्गत आहेत. १५९ इमारतींची आतापर्यंत वीज व पाण्याची जोडणी तोडण्यात आलेली आहे. इमारती कोसळून होणा-या दूर्घटनांमध्ये जिवीतहानी होऊ नये याकरिता महापालिका आयुक्त यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

मे अखेरपर्यंत नाले सफाई करा -
२५४.६४ किलोमीटर लांबीच्या मोठ्या नाल्‍यांमधून एकूण ३ लाख ४९ हजार ५० टन गाळ काढावयाचा आहे. त्यातील पावसाळ्यापूर्वी ७० टक्के गाळ काढावायाचा असून १४ मे पर्यंत २ लाख ४४ हजार ३३५ टन गाळ काढण्‍यात आला आहे. तर ४४३.८५ किलोमीटर लांबीच्या छोटया नाल्‍यांमधून एकूण ३ लाख ९ हजार ७७७ टनापैकी २ लाख १६ हजार ८४३ टन गाळ काढण्‍यात आला. मे अखेरपर्यंत १०० टक्के नालेसफाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

Post Bottom Ad