मुंबई - घाटकोपर-अंधेरी लिंक रोडचे निर्माण कार्य गेली अनेक वर्षे अर्धवट स्थितीत पडले आहे. परिणामी घाटकोपरमध्ये वाहन चालकांबरोबरच पादचाऱ्यांना देखील मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सर्वोदय रुग्णालयाच्या मागून श्रेयस सिनेमा सिग्नलपर्यंत काही बांधकामे हटवणे, रस्त्याच्या कडेने सांडपाणी वाहून नेण्याची कामे ठप्प पडल्याने या रस्त्याच्या कडेला असलेल्या वस्तीमधून येणारे सांडपाणी थेट या रस्त्यावरून वाहून वारंवार अपघात होत आहेत. त्याच बरोबर हे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहत असल्याने या रस्त्यावर गलिच्छ वातावरण निर्माण झाले आहे.
पूर्व उपनगराला पश्चिम उपनगराशी जोडणारा हा मुख्य रस्ता असला तरी पालिका प्रशासनाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे. घाटकोपरमध्ये तर या रस्त्याची प्रचंड दुरवस्था आहे. जागृती नगर मेट्रो स्थानकाच्या पुढे डोंगरावरून येणारे सांडपाणी थेट रस्त्यावर धबधब्यासारखे पडते. यावर पालिकेचे संथगतीने काम सुरू आहे. तर तिथूनच काही अंतरावर घाटकोपर रेल्वे स्थानक, अमृत नगर, जागृती नगर आणि श्रेयस सिनेमाकडे जाणाऱ्या रस्त्यांचा चौक आहे. इथून पुढे श्रेयस सिग्नलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वाहिनीचे काम सुरू असल्याने तो बंद होता. परंतु ही वाहिनी सुरू करताच या रस्त्यावर बाजूच्या वस्तीचे सर्व सांडपाणी रस्त्यावर येते. या रस्त्यावर चोवीस तास हे दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असते.
याबाबत स्थानिक रहिवासी संभाजी काटे म्हणाले की, आम्ही पालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या. स्वच्छता ॲपवर देखील तक्रार केली. परंतु हे सांडपाणी बंद केले जात नाही. इथल्या नागरिकांना आजाराला सामोरे जावे लागेल किंवा एखादा मोठा अपघात होईल, तेव्हाच पालिकेला जाग येणार का? असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे. याबाबत स्थानिक नगरसेवक सुरेश पाटील म्हणाले की, या ठिकाणी दोन ते तीन वेळा जेसीबीच्या सहाय्याने स्वच्छता करण्याचा प्रयत्न केला, परंतु वारंवार हे सांडपाणी रस्त्यावर येते. याबाबत लवकरच कायमस्वरूपी उपाययोजना केली जाईल.