नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालाला दोन दिवस शिल्लक असताना सत्ताधारी आणि विरोधकांचे बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आज (२१ मे) १९ विरोधी पक्षांची बैठक पार पडली आहे.
विरोधकांची बैठक आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री आणि टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे. “आम्ही गेल्या दीड महिन्यापासून इव्हीएम मशीनवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत आहोत. तर देखील निवडणूक आयोग इव्हीएम मशीनच्या मुद्द्यावर कोणत्याही प्रकरणाचा प्रतिसाद देत नाही. आयोगासोबत आम्ही एक तास चर्चा केली असून उद्या (२२ मे) निवडणूक आयोगाची भेट घेणार असल्याचे,” काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक श्रीवास्तव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह डावे पक्ष, बसपा, सपाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यानंतर आज १९ विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली.
ईव्हीएमबद्दल तक्रार -
ही बैठकीत निवडणूक आयोगाकडे ईव्हीएमबद्दल तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची १०० टक्के पडताळणी करण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मागणीबद्दल विरोधकांची निवडणूक आयोगासोबत चर्चा देखील झाली.