मुंबई - स्टार प्रवाहवर 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा' ही मालिका सुरू झाली. मालिकेत बाबासाहेबांच्या भूमिकेत अभिनेता सागर देशपांडे याचं कौतुक होत असताना, बाबासाहेबांच्या पत्नीची अर्थात रमाबाई आंबेडकरांची भूमिका कोण साकारणार याविषयी सर्वांना उत्सुकता होती. ही उत्सुकता आता संपली आहे. या मालिकेत रमाईची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारणार असून तिनं हे सोशल मीडियावर शेअर केलंय.
शिवानीनं सोशल मीडियावर तिचा फोटो शेअर करत याबाबत सांगितले, तिनं लिहिलंय की, 'एखादं सशक्त ऐतिहासिक पात्र साकरण्याचं नेहमीच माझं स्वप्न होतं आणि माझं स्वप्न साकार झालंय. मला 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेत रमाबाई साकारायची संधी मिळाली आहे. या प्रवासाचा मी भाग होऊ शकले याचा मला प्रचंड आनंद आहे. रमाबाईंकडून किती गोष्टी शिकण्यासारख्या आहेत हे मला हळूहळू जाणवतंय ' असं शिवानीनं लिहिलंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यात रमाबाईंना अनन्यसाधारण महत्त्व होते. त्यांच्या कार्यात रमाबाईंचा मोलाचा वाटा होता. बाबासाहेबांच्या सोबतीने रमाबाईसुद्धा समाज जागृतीसाठी झटत राहिल्या. रमाबाईंनी घर-संसार तर सांभाळलाच शिवाय, समाजकार्यासाठी बाबासाहेबांचा हक्काच्या आधारस्तंभ बनल्या. बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य पीडितांच्या, पददलितांच्या उद्धारासाठी खर्ची केले... ते त्यांचे बाबा झाले; पण रमाबाईंनीदेखील या सगळ्यांना माया लावली, प्रसंगी आपले दागिने गहाण ठेवले पण मुलांना उपाशी राहून दिले नाही. स्वत: हालअपेष्टा सोसल्या पण बाबासाहेबांना, त्यांच्या कार्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांंना याची कधीही जाणीव होऊ दिली नाही. ती खऱ्या अर्थानं या सगळ्या लेकरांची 'रमाई' झाली.