श्रावणी चव्हाण मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 May 2019

श्रावणी चव्हाण मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण


मुंबई - रविवारी दुपारी दादरच्या पोलीस वसाहतीत लागलेल्या आगीत श्रावणी चव्हाण या 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. सिलेंडरच्या स्फोटात घर बंद असल्यामुळे श्रावणीला प्राण गमवावे लागले. पोलिसांच्या तपासात प्रथमदर्शनी स्फोट झालेले घर बाहेरून बंद असल्याचे सांगण्यात आले होते. यावेळी श्रावणीला अभ्यास करण्यासाठी घरात बंद करण्यात आल्याचे समजते. तिला घरामध्ये बंद करून कुटुंबातले सदस्य लग्नाला गेले असताना हा स्फोट झाल्याचे समोर आले आहे. यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून पोलीस सर्व बाजूनी तपास करत आहेत.

दरम्यान, रॉकेलसारखा ज्वलनशील पदार्थ घरात असल्यामुळे सिलेंडरच्या स्फोटात आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे शेजारच्या तीन घरांचेही प्रचंड नुकसान झाले. पालकांच्या अभ्यासाच्या अट्टाहासामुळे 15 वर्षीय मुलीला या घटनेत प्राण गमवावे लागले. आग लागली, त्यावेळी श्रावणी एकटीच घरी होती. बाहेरुन कुलूप असल्यामुळे सर्व जळून खाक झाल्यानंतर तिला बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे या ठिकाणी आग लागल्याचे म्हटले होते. मात्र, त्याच वेळी रॉकेलचे डबेदेखील आढळून आल्यामुळे हा अपघात होता की श्रावणीने आत्महत्या केली हे अद्याप अस्पष्ट आहे. तसेच पालकांनी पाल्याला अभ्यासासाठी बंद खोलीत ठेवणे कितपत योग्य आहे, असा प्रश्नदेखील आता उपस्थित झाला आहे.

Post Bottom Ad