पुरेसे पाणी व चारा उपलब्ध होईपर्यंत चारा छावणी व टँकर सुरु - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 June 2019

पुरेसे पाणी व चारा उपलब्ध होईपर्यंत चारा छावणी व टँकर सुरु

मुंबई - राज्यात जूनच्या मध्यापर्यंत पावसाला सुरूवात होणार असली तरी पुरेसे पाणी तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध होईपर्यंत चारा छावणी व टँकर सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण उपाय योजनासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे शेळ्या मेंढ्यांसाठीची राज्यातील पहिली चारा छावणी सांगोला तालुक्यात सुरू झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दुष्काळ निवारणासंदर्भातील उपाययोजना सुचविण्यासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सहकारमंत्री सुभाष पाटील, पर्यटन व रोहयोमंत्री जयकुमार रावल, कृषी सचिव एकनाथ डवले, मदत व पुनर्वसन मंत्री किशोरराजे निंबाळकर यावेळी उपस्थित होते. यावेळी आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांचा आढावा पाटील यांनी घेतला.

पाटील म्हणाले, सध्या राज्यात 1583 छावण्या सुरू असून त्यामध्ये लहान व मोठी अशी एकूण 10 लाख 68 हजार 375 जनावरे आहेत. चारा छावण्यांसाठी औरंगाबाद विभागाला 135.18 कोटी, पुणे विभागासाठी 5.07 कोटी, नाशिक विभागासाठी 47 कोटी, पशुसंवर्धन विभागाला 13.81 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. तसेच चारा छावणीसाठी आगाऊ रक्कम देण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत राज्यातील 4920 गावे व 10 हजार 506 वाड्यांमध्ये 6209 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. राज्यात 17 जूनपर्यंत पावसाला सुरूवात होईल. त्यानंतर जलयुक्त शिवारमुळे केलेल्या कामाच्या ठिकाणी पाणी साठण्यास सुरूवात होईल. राज्यातील दुष्काळी निधीचे वाटपही सुरू असून आतापर्यंत 67लाख 47 हजार 835 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4419 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे. रोजगार हमी योजनेची 38 हजार 811 कामे सुरू असून त्यावर 3 लाख77 हजार 328 मजूर उपस्थित आहेत.

जळगावमधील केळी पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश -
जळगावमध्ये काल झालेल्या पावसामुळे केळी पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. राज्य शासन केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Post Bottom Ad