मुंबई - एसटीतील मुस्लिम कर्मचारी बांधवांना ईद उल फितर (रमजान ईद) उत्साहात साजरी करता यावी, यासाठी या कर्मचाऱ्यांचे मे महिन्याचे वेतन लवकर म्हणजे ४ जून रोजी करावे, असे आदेश परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा ७ तारखेला होते. पण मुस्लिम बांधवांचा सण लक्षात घेऊन त्यांचे वेतन तातडीने उद्याच करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एसटी महामंडळाच्या 71 वर्षाच्या इतिहासात प्रथमच असा निर्णय घेऊन मंत्री रावते यांनी एसटी महामंडळातील मुस्लिम कर्मचार्यांना ईदची अनोखी भेट दिली आहे. सर्व मुस्लिम बांधवांना त्यांनी ईदनिमित्त हार्दिक शुभेच्छाही व्यक्त केल्या आहेत.
एसटी महामंडळात सुमारे १ लाख कर्मचारी आहेत. या सर्वांचा पगार दर महिन्याला ७ तारखेला होतो. परंतु अशा विशेष सण, उत्सवावेळी त्यांना कपडे खरेदी किंवा इतर खर्चासाठी पैशाची अत्यंत निकड असते. त्यामुळे त्यांना अॅडव्हान्स पगार मिळाला तर सण, उत्सवाचा आनंद द्विगुणित होऊ शकतो. या भावनेने एसटी महामंडळाने मंत्री रावते यांच्या आदेशान्वये यापूर्वीदेखील दिवाळी, गणपती उत्सव अशा विशेष सणाला ७ तारखेऐवजी अगोदर वेतन अदा केले आहे. त्यानुसार एसटीमध्ये कार्यरत असलेल्या मुस्लिम बांधवांना ईद साजरी करण्यास पैशाअभावी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी यंदाचा पगार जून महिन्याच्या ४ तारखेला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याच्या सूचना मंत्री रावते यांनी एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. या निर्णयाचे सर्व मुस्लिम कर्मचारी बांधवांकडून स्वागत होत आहे.