दिव्यांश प्रकरण - गटारावरील झाकण काढणा-यांवर एफआयआर दाखल करा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दिव्यांश प्रकरण - गटारावरील झाकण काढणा-यांवर एफआयआर दाखल करा

Share This
मुंबई -- मुंबईतील गोरेगाव येथील आंबेडकर चौकातल्या उघड्या गटारात पडलेला दीड वर्षाचा दिव्यांश आठवडाभराचा कालावधी लोटला तरीही त्याचा शोध लागलेला नाही. या गटाराचे झाकण उघडे ठेवल्याने ही घटना घडली आहे. त्याची चित्रफितही पालिकेच्या हाती लागली आहे. या पार्श्वभूमीवर गटाराचे झाकण काढणा-यांवर एफआयआर दाखल करावा असे पत्र पालिकेने दिंडोशी पोलिस ठाण्याला पाठवले आहे. त्यामुळे लवकरच संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

गोरेगाव पूर्व येथील आंबेडकर नगरात राहणारा दिव्यांश खेळताना घराबाहेर आला. काही वेळातच घरी परतत असताना इटालियन कंपनीजवळील आंबेडकर चौक परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात चिमुकला दिव्यांश पडला. आठवडा भराचा कालावधी उलटला तरी दिव्यांशचा शोध लागलेला नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये संतापाच्या प्रतिक्रिया आहेत. अग्निशमन दल, मुंबई महापालिकेकडून विविध मार्गाने शोध घेण्यात आला, एनडीआरएफलाही पाचारण करण्यात आले, मात्र अथक प्रयत्नानंतरही दिव्यांशचा शोध लागलेला नाही. दिव्यांश ज्या गटारात पडला त्या गटाराचे झाकण उघडे होते. दिव्यांश गटारात पडताना बाजूच्या मशिदीमध्ये असलेल्या सीसीटिव्ही कॅमे-यामधून समोर आले. त्यानुसार दिव्यांशचा शोध सुरु करण्यात आला होता. मुंबईमध्ये १ जुलै रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचे सखल भाग जलमय झाले होते. मालाड पूर्व येथील आंबेडकर चौक आणि आसपासच्या परिसरातही प्रचंड पाणी साचले होते. त्याच वेळी आंबेडकर चौकातील ‘त्या’ गटारावरील झाकण एका व्यक्तीने काढल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणातून स्पष्ट झाले आहे. मात्र गटारावरील झाकण काढणारी व्यक्ती कोण याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने त्याचा शोध घेतला जाणार आहे. ही चित्रफित पालिकेच्या हाती लागली असून त्यात १ जुलै रोजी हे झाकण काढल्याचे त्यात दिसते आहे, मात्र झाकण काढणारी व्यक्ती त्यात दिसत नसल्याने त्याचा शोध घेणे सुरु आहे. १ जुलै रोजी मुसळधार पाऊस पडत असताना सखल भागात पाणी साचले होते. पाण्याचा निचरा करण्यासाठी अज्ञात व्यक्तीने हे झाकण काढले असून या घटनेस ती व्यक्ती जबाबदार असल्याने त्याच्यावर एफआयआर दाखल करावा असे पालिकेने पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

कचरा फेकणाऱ्यांचीही चौकशी होणार -
पालिकेने याच भागात स्वच्छता मोहीम राबविली होती. त्या वेळी या गटाराजवळच अस्वच्छता करणा-या एका भंगारवाल्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे या परिसरात कचरा टाकणाऱ्यांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages