आपद्ग्रस्तांना प्रतिकुटुंब पाच हजार रोखीने अर्थसहाय्य - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 August 2019

आपद्ग्रस्तांना प्रतिकुटुंब पाच हजार रोखीने अर्थसहाय्य - मुख्यमंत्री

मुंबई, दि. 11 : पूरपरिस्थितीत बाधीत झालेल्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या मदतीपैकी प्रतिकुटुंब रोखीने पाच हजार अर्थसहाय्य तातडीने वितरीत करा तसेच उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. 

मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कक्षाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर, माहिती व जनसंपर्क सचिव ब्रिजेश सिंह, मंत्रालय नियंत्रण कक्षाचे सहसचिव अरुण उन्हाळे,आपत्ती निवारण प्रभागाचे संचालक अभय यावलकर यावेळी उपस्थित होते.

बाधीत नागरिकांना रोख रकमेचे वितरण करण्यासोबतच नादुरुस्त पाणीपुरवठ्याच्या योजना तातडीने दुरुस्त करुन नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. बाधीत गावांमध्ये स्वच्छतेची मोहीम प्राधान्याने हाती घेण्यासोबतच रस्ते, पुलांच्या दुरुस्तीसह गावांमध्ये जनजीवन सुरळीत होण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

स्वच्छतेच्या मोहिमेसाठी शासकीय, निमशासकीय, खाजगी स्तरावर उपलब्ध होणारी सर्व यंत्रणा कामाला लावा. बाधीत गावांमध्ये औषधांची फवारणी, पूर परिस्थितीमुळे प्रभावीत झालेल्या कुटुंबियांना दैनंदिन आर्थिक मदत तसेच पेट्रोल,डिझेल व गॅसपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. खंडित वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. शिरोळ येथे तातडीने चारा पोहोचविण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या.

महामार्गांवर ज्याठिकाणी वारंवार पाणी साचून वाहतूक बाधीत होते,अशाठिकाणी उड्डाणपुले बांधण्याचे प्रस्तावित करण्याच्या सुचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या. सांगलीत आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीसाठी कवलापूर येथे सुसज्ज विमानतळ बनविण्याबाबत सूचना दिल्या.

राज्यातील 10 जिल्ह्यांत पूरपरिस्थिती असून 70 तालुके व 761 गावे बाधित झाली आहेत. 4 लाख 47 हजार 695 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. मदतकार्यात एनडीआरफ 32 टिम, एसडीआरफ 3 टिम, आर्मी 21 टिम, नेव्ही 41,कोस्ट गार्ड 16 टिम राज्यात कार्यरत आहेत. 226 बोटी द्वारे बचावकार्य सुरु आहे. पूरपरिस्थितीमुळे 32 व्यक्तींचा मृत्यू झाला तर 4 व्यक्ती जखमी झाल्या. 48 जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत.

कोल्हापूर येथे पाण्याची पातळी 1 फुट 11 इंचाने व सांगलीतील पाण्याची पातळी3 फूटाने ओसरली आहे. शिरोळ येथे 62.9 फुट पाण्याची पातळी आहे. अलमट्टी धरणामध्ये 6 लाख 8 हजार 33 क्यूसेक इन फ्लो असून विसर्ग 5 लाख 70 हजार क्युसेक आहे. पुणे विभागातील 27 तालुके बाधित असून 585 गावांचा त्यात समावेश आहे. त्यामध्ये 2 महानगरपालिका आणि 15 नगरपालिकांचा समावेश आहे.

सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांतून 4 लाख 13 हजार 985नागरिकांना 535 आश्रय शिबीरात सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यात एकूण 51 पथके, 95 बोटी व 569 जवानांमार्फत बचाव कार्य सूरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 54 पथके, 74 बोटी आणि 456 जवानांमार्फत बचाव कार्य सुरु आहे. सांगली जिल्ह्यात 80, कोल्हापूर जिल्ह्यात 150 आणि सातारा जिल्ह्यात 72 वैद्यकीय पथके कार्यरत आहेत.

सांगली जिल्ह्यात 66 रस्ते वाहतूकीसाठी बंद असून 33 पूल पाण्याखाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात 91 रस्ते वाहतूकीसाठी बंद असून 39 पूल पाण्याखाली आहेत. सातारा जिल्ह्यात 5 रस्ते वाहतूकीसाठी बंद असून 3 पूल पाण्याखाली आहेत. सोलापूर जिल्ह्यात 33 रस्ते बंद असून 14 पूल पाण्याखाली आहेत.

राज्यात आज अखेर 802.70 मि.मि. पावसाची नोंद झाली असून ती सरासरीच्या109.43 टक्के आहे. मागील वर्षी यावेळी ती 79.22 टक्के होती. राज्यात आतापर्यंत 58 टक्के पाणीसाठा पावसामुळे निर्माण झाला आहे. जायकवाडी धरण80 टक्के तर उजनी धरण 100 टक्के भरलेले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांना दिली.

Post Bottom Ad