Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मराठवाड्याला कृत्रिम पावसाची खोटी स्वप्ने दाखवणे बंद करा!: अशोक चव्हाण

मुंबई, दि. २२ ऑगस्ट - मराठवाड्यात कृत्रिम पावसाचे प्रयोग अपयशी ठरत असतील तर सरकारने वस्तुस्थिती स्वीकारावी आणि जनतेला खोटी स्वप्ने दाखवणे बंद करावे, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

कृत्रिम पावसासंदर्भातील प्रयोगांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, जगभरात कृत्रिम पावसासाठी प्रयोग केले जातात. महाराष्ट्रातही अनेक वर्षांपासून हे प्रयोग सुरू आहेत. या प्रयत्नांना कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. पण मराठवाड्यात सातत्याने हे प्रयोग होत असताना अद्याप अपेक्षित यश प्राप्त झालेले नाही. सरकारकडून कृत्रिम पावसासाठी नवनवीन मुहूर्त जाहीर केले जातात. जनता दरवेळी आशेवर असते की, किमान आता तरी पाऊस पडेल. पण या प्रयत्नांमध्ये सतत निराशाच हाती येते आहे.

दुष्काळ किंवा कृत्रिम पावसाचा मुद्दा हा राजकारणाचा मुद्दा नाही. त्यामुळे तांत्रिक अडचण किंवा नैसर्गिक कारणांमुळे कृत्रिम पाऊस शक्य होत नसेल तर सरकारने तसे जाहीर केले पाहिजे. सरकार फारच कार्यतत्पर आहे, हे दर्शविण्यासाठी अकारण कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी करू नये. मराठवाड्याला खोटी स्वप्ने दाखवू नयेत आणि जनतेला आशेवर ठेवू नये. तसेच या प्रयोगांवर नाहक खर्ची पडणारा कोट्यवधी रूपयांचा निधी दुष्काळी उपाययोजनांसाठी खर्च करावा, असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. 

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom