मुंबई - केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी गेल्या दोन वर्षांपासून दत्तक घेतलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील भीम या नर बिबट्याचा सोमवारी मृत्यू झाला. बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्या बचाव केंद्रात मागच्या 9 वर्षांपासून भीम बिबट्या राहत होता. सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हृदयक्रिया बंद पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. ‘भीम’च्या मृत्यूमुळे त्याचा भाऊ ‘अर्जुन’ आता एकटा पडला आहे. दरम्यान रिपाई पक्षाद्वारे आज नॅशनल पार्कच्या गेट वर वन विभागाविरुद्ध आंदोलन करण्यात आले.
मागच्या नऊ वर्षांपासून 'भीम'चे वास्तव्य संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होते. 2010 मध्ये शहापूरमध्ये बिबट्याची दोन पिल्ले बेवारस अवस्थेत सापडली होती. त्यांच्या आईचा कुठेच पत्ता न लागल्याने वन विभागाने अखेरीस त्यांची रवानगी बिबट्या बचाव केंद्रात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाअंतर्गत त्यांना मुंबईतील ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’च्या ताब्यात देण्यात आले. या ठिकाणी दाखल झाल्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी त्यांचे नामकरण ‘भीम’ आणि ‘अर्जुन’ असे केले. तेव्हापासून हे दोन्ही बिबटे येथील बिबट्या केंद्राचे आकर्षण बनले होते. पण सोमवारी यामधील ‘भीम’ बिबट्याने अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ‘भीम'चा मृत्यू झाल्याची बाब प्राथमिक शवविच्छेदन अहवालाच्या माध्यमातून समोर आली आहे.
भीम पँथरचा मृत्यू झाल्यानंतर त्याबाबत केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांना न कळविता भीम पँथर चा अंत्यविधी वन अधिकाऱ्यांनी त्वरित उरकून टाकला. त्यामुळे संतप्त झालेल्या रिपाइं कार्यककर्त्यांनी भीम पँथर च्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी तसेच फॉरेन्सिक चाचणी द्वारे बिबट्याच्या मृत्यूचे कारण शोधण्यात यावे या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे आज वन विभाग अधिकाऱ्यांविरुद्ध तीव्र निषेध आंदोलन करण्यात केले. या आंदोलनाचे नेतृत्व कुमार जित आठवले तसेच रिपाइंचे मुंबई प्रदेश युवक आघाडीचे अध्यक्ष रमेश गायकवाड; हरिहर यादव; दिलीप व्हावळे; अमित तांबे रतन अस्वारे यांनी केले. मुख्य वनसंरक्षक यांनी बिबट्याच्या मृत्यूची चौकशी करणार असल्याचे आश्वासन रिपाइं च्या आंदोलकांना दिले.