जी-उत्तर विभागातील प्रभादेवी, गोखले रोड येथील जाखादेवी मंदिरालगत प्रसूतिगृह आणि दवाखाना याकरिता आरक्षित असलेला मुंबई महापालिकेचा भूखंड श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाला भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहे. या भूखंडावर तळ मजला + आठ मजली इमारत महापालिकेतर्फे बांधण्यात येणार आहे. त्यापैकी तळमजला आणि वरील दोन मजले महापालिका रुग्णसेवेसाठी वापरणार आहे, तर वरील सहा मजले श्री सिद्धिविनायक मंदिर न्यायाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या मोठ्या रुग्णालयांमध्ये ज्या सुविधा असतात तशा सुविधा या रुग्णालयामध्ये पुरविण्यात येणार आहेत.
20 वर्षांच्या प्रयत्नांना यश -
प्रभादेवी भागात आत्याधुनिक रुग्णालय असावे म्हणून 1997 पासून प्रत्न सुरू होते. सभागृह नेतेपदी निवड झाल्यानंतर आयुक्त अजोय मेहता यांच्यापुढे प्रस्ताव ठेवला. त्यांनी मान्यता दिली आणि विद्यमान आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी त्याला मूर्तरूप दिले. स्वप्न सत्यात उतरल्याचा आनंद आहे.
--विशाखा राऊत, सभागृह नेत्या
सिद्धिविनायक मंदिरातर्फे रुग्णसेवा -
सिद्धविनायक मंदिर न्यासातर्फे वर्षभरात राज्यातील 8000 रुग्णांना 14 कोटी रुपयांची मदत करण्यात आली. मात्र या रुग्णालातील अत्याधुनिक सुविधांमुळे मुंबईतील रुग्णांची सेवा घडेल आणि महापालिकेच्या मुख्य रुग्णालांवरील भार कमी होईल.
--आदेश बांदेकर, अध्यक्ष, सिद्धिविनायक मंदिर न्यास