
नवी दिल्ली : भारतातील धर्मनिरपेक्षतेचे संरक्षण करण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाच्या खांद्यावर आहे, असे मत काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनी रविवारी व्यक्त केले आहे. हिंदी भाषिक राज्यांमध्ये काँग्रेस पक्षासमोरील अडचणी दूर करण्यासाठी बहुसंख्यकांच्या तुष्टीकरणाचा पवित्रा अंगिकारावा लागेल. केवळ 'कोक लाईट'च्या धरतीवर 'सॉफ्ट हिंदुत्ववादी' भूमिका घेतल्याने काहीही फरक पडणार नाही. या उलट काँग्रेस पक्ष आणखी रसातळाला जाईल, अशा शब्दांत त्यांनी पक्षाला आरसा दाखवला आहे. .
आपल्या 'दि हिंदू वे : ॲन इंट्रडक्शन टू हिंदुइज्म' या पुस्तकाच्या विमोचनापूर्वी तिरुअनंतपुरमचे खा. शशी थरूर यांनी पीटीआयला विशेष मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले की, सत्ताधाऱ्यांकडून खरे हिंदुत्व सांगितले जात नाहीय. हिंदुत्वाला विकृत बनवले जात आहे. एवढेच नव्हे तर हिंदुत्वाला निवडणुकीचा लाभ घेण्यासाठी संकुचित राजकीय शस्त्राच्या रूपात परावर्तित केले जात आहे, असा टीकात्मक सूर त्यांनी काढला. देशात धर्मनिरपेक्षतेचा पाया मजबूत करण्यासाठी काँग्रेसने पायाभूत भूमिका वठवावी. कारण, धर्मनिरपेक्षतेचे नेतृत्व करण्याचे कर्तव्य काँग्रेसलाच पार पाडावे लागणार आहे. भाजपाचे यश पाहून भयभीत न होता काँग्रेसने स्वत:चे सिद्धांत टिकवण्यासाठी प्रयत्न करावा, असेही थरूर म्हणाले. दरम्यान, देशात कायदे बनवण्यासाठी पोप नाही. कोणताही इमाम फतवा जारी करीत नाही. पोप असो वा इमाम कोणीही सत्यता सांगत नाहीत, हेच हिंदुत्वाचे खरे सौंदर्य आहे, अशी नवी व्याख्या त्यांनी मांडली..