मुंबई, दि. 10 – आपल्या सर्वांची आहे ही जबाबदारी ! चला करुया 21 तारखेच्या मतदानाची तयारी ! असा मुंबईकरांना मतदानाचा संदेश फ्लॅश मॉबद्वारे देत मुंबई शहरातील मतदानाचा टक्का अधिक वाढावा यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर यांच्याकडून देण्यात येत आहे. आज केंद्रीय निवडणूक निरीक्षक बिजल शहा यांच्या प्रमुख उपस्थित दादर येथील नक्षत्र मॉल येथे फ्लॅश मॉबचे आयोजन करण्यात आले होते. त्यास दादरकरांनी उत्साही दाद दिली.
दि. 21 ऑक्टोंबर 2019 रोजी मतदान होणार असून मुंबईकरांमध्ये मतदानाबाबत जनजागृती होवून उत्साह वाढावा , मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि मतदानाची टक्केवारी वाढवावी, यासाठी मुंबई शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी फ्लॅश मॉबचे आयोजन करुन ‘ सर्वांची आहे ही जबाबदारी ! चला करुया 21 तारखेच्या मतदानाची तयारी ! ’ असा संदेश देण्यात येत आहे.
या फ्लॅश मॉबमध्ये पथनाट्य, नृत्य , देशभक्तीपर गीतातून राष्ट्रीय एकात्मतेच्या आणि विविध सादरीकरणातून योग्य तो संदेश युवावर्गापर्यंत जातो. नृत्य आणि नाटक यांचा योग्य तो संगम साधून मतदारांना मतदानासाठी जागृत करण्यात येत आहे. पुढील काळात, मुंबई सेंट्रल, सायन, सीआर 2 मॉल, जयहिंद कॉलेज, रुईया कॉलेज, खालसा कॉलेज, अशा प्रमुख ठिकाणी फ्लॅश मॉबचे आयोजन व ईव्हीएम व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक करण्यात येणार आहे. अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी दिली.