मुंबईत 172 रुग्णांना टीबी तर 5,342 संशयित टीबी रूग्ण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 October 2019

मुंबईत 172 रुग्णांना टीबी तर 5,342 संशयित टीबी रूग्ण



मुंबई - टीबी आणि कुष्ठरोग याचं निदान वेळीच व्हावं यासाठी मुंबईसह राज्यभरात विशेष रुग्ण शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहिमेद्वारे मुंबईत 5,342 संशयित टीबी रूग्ण आढळून आले असून यातील 172 रुग्णांना टीबी असल्याची धक्कादायक माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टमधून समोर आली आहे.  

पालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे मिळालेल्या आकडेवारीनुसार, मुंबईतील 10 लाख घरांचं सर्वेक्षण करण्याचं ध्येय ठेवण्यात आलं होते. परंतु, त्यातील नऊ लाख 29 हजार 027 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून यातील 25 लाख 36 हजार 140 लोकांची आरोग्य तपासणी केली. या तपासणीत संशयास्पद टीबीचे 5,342 रुग्णांची नोंद करण्यात आलीये. यामध्ये 4,108 रुग्णांच्या थुंकीची तपासणी करण्यात आली असून 2,986 जणांची एक्स-रे काढण्यात आले आहेत. तर 1,076 जणांची CBNAAT चाचणी करण्यात आलीये. या सर्व वैद्यकीय चाचणीतून 172 जणांना टीबी असल्याचं समोर आलंय. याशिवाय 1,127 मुंबईकरांमध्ये कर्करोगाची लक्षणं आढळून आली आहेत. तर कुष्ठरोगासाठी 25 लाख मुंबईकरांची स्क्रिनिंग करण्यात आली. ज्यापैकी 2 हजार 362 संशयित कुष्ठरोगग्रस्त आढळले आहेत. या रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागातील कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर म्हणाल्या की, ‘‘मुंबईसह राज्यभरातील असंसर्गजन्य आजारांच्या रूग्णांचा शोध घेण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली होती. यामध्ये 2 हजार 500 हून अधिक कर्मचारी 22 वॉर्डामध्ये आरोग्य अधिकारी तपासणी करण्यासाठी नेमण्यात आले होते. त्यानुसार आता 13 लाख लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून वैद्यकीय चाचणीत कुठलाही आजार असल्याचं आढळून आल्यास अशा रुग्णांना पुढील उपचारांसाठी आरोग्य केंद्रात पाठवलं आहे.’’

राज्यभरात राबवण्यात आलेल्या या मोहिमेतंर्गत मुंबईत सुमारे 45 लाख लोकांची तपासणी करण्याचे ठरवण्यात आले होते. त्यानुसार आशा सेविकांची मदत घेऊन मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरोघरी जाऊन असंसर्गजन्य आजारांचे आणि अतिजोखमीच्या रुग्णांची शोध मोहीम घेण्यात आली होती. 

Post Bottom Ad