जास्त आवाजाचे किंवा अवेळी फटाके फोडल्यास पोलीसांकडून कारवाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जास्त आवाजाचे किंवा अवेळी फटाके फोडल्यास पोलीसांकडून कारवाई

Share This

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने फटाके किती क्षमतेचे आणि कोणत्या वेळेत वाजवावेत याबाबत आदेश जारी केले आहेत. याबाबत मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यांना कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असून नागरिकांनी न्यायालयाने दिलेली वेळेची आणि आवाजाच्या क्षमतेची मर्यादा पाळावी, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. अवेळी आणि जास्त आवाजाचे फटाके फोडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.  

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव त्यानंतर विधानसभा निवडणुका आणि आता दिवाळीसाठी मुंबई पोलिस कामाला लागले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१८मध्ये फटाके वाजविण्यावर वेळेचे बंधन घातले आहे. फटाके वाजविण्यासाठी रात्री आठ ते दहा ही वेळ दिली आहे. मात्र तरीही मुंबईत दिवाळीच्या चार दिवसांत अवेळी फटाक्यांचा दणदणाट सुरू असतो. नागरिकांना न्यायालयाच्या आदेशाबाबत कळावे यासाठी पोलिसांच्या वतीने वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. तरीही कोणी या आदेशाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्यावर भादंवि कलम १८८ किंवा अन्य कलमांद्वारे गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. हे कृत्य त्या व्यक्तीने पहिल्यांदा केले, अजाणतेपणी केले की, कसे यावर न्यायालयात युक्तिवाद होऊन दंड किंवा कारावासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे रात्री उशिरा फटाके फोडू नयेत, असे पोलिसांनी म्हटले आहे. दिवाळीच्या कालावधीत गस्त वाढविण्यात आली आहे. विशेषत: रात्री दहानंतर गस्तीवर भर देण्यात आला आहे. महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसही तैनात करण्यात येणार आहेत.

१०० पेक्षा अधिक गुन्हे -
मुंबईतून विविध माध्यमातून आलेल्या तक्रारींवर कारवाई करीत मुंबई पोलिसांनी २०१८ मध्ये १०० पेक्षा अधिक गुन्हे दाखल केले होते. कोणी अवेळी फटाके फोडू नये यासाठी मुंबई पोलिसांच्या वतीने उद्घोषणा करून जनजागृती करण्यात येत होती. काही ठिकाणी तर पोलिसांनी समज देण्याचाही प्रयत्न केला. मात्र, तरीही फटके वाजवणे सुरूच राहिल्याने हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच बेकायदा फटाके विक्री करणाऱ्या ५३ जणांवर कारवाई करण्यात आली होती.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages