
बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी १० ऑक्टोबर रोजी अर्थसंकल्प बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांच्याकडे सुपूर्द केला होता. पण, आचारसंहितेमुळे हा अर्थसंकल्प सीलबंद होता. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर आजच्या बैठकीत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. बेस्टच्या परिवहन विभागातील तूट ही प्रामुख्याने भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या बससेवांसाठी गृहीत धरली आहे. तत्कालीन स्थितीत बेस्टच्या परिवहन विभागाच्या तोट्याची रक्कम २,२०० कोटी रु. आहे. २०१८ ते २०१९ कालावधीत बेस्टचा तोटा ३८० कोटी रुपयांच्या आसपास होता. हा तोटा २०१९-२० मध्ये ८३३ कोटी रुपयांवर गेल्याने बेस्टची आर्थिक स्थिती आणखीनच खालावली. मुंबई पालिकेने बेस्टला आर्थिक मदत दिल्यानंतर उपक्रमाची स्थिती सुधारण्यास मदत झाली आहे. बेस्टने तिकिटांमध्ये कपात केल्याने प्रवासी वाढले आहेत. पण दैनंदिन उत्पन्न कमी होत चालले आहे. आता बेस्टला १०० रुपयांच्या खर्चापोटी फक्त ३५ रुपये उत्पन्न मिळत आहे. २०१९ मध्ये उत्पन्न ५९ कोटी, तर खर्चाची रक्कम १७१ कोटी रुपयांवर गेली.
