कांजूरमार्ग येथील आरक्षित भूखंडावर नाट्यगृह उभारणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कांजूरमार्ग येथील आरक्षित भूखंडावर नाट्यगृह उभारणार

Share This

मुंबई - मुंबईच्या विकास आराखड्यातील तरतूदीनुसार कांजूरमार्ग येथील आरक्षित भूखंडावर नाट्यगृह बांधण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ही जागा खासगी मालकीची असल्याने पालिकेकडून त्याचे भूसंपादन करून ताबा घेतला जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येथे नाट्यगृह उभे राहणार आहे. या नाट्यगृहाचा लाभ कांजूरमार्ग, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व पवई येथील नागरिकांना होणार आहे. 
 
पूर्व उपनगरातील कांजूरमार्ग आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना जवळपास नाट्यगृहाची व्यवस्था नाही. मुंबईच्या विकास आराखड्यात कांजूरगाव येथील जमीन नाट्यगृहासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. भाजपच्या नगरसेविका साक्षी दळवी यांनी ही जमीन नाट्यगृहासाठी संपादित करावी अशी मागणी केली होती. या मागणीवर पालिका प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय दिला आहे. ही जमीन खासगी मालकीची असल्याने पालिकेला भूसंपादन करून ताब्यात घ्यावी लागणार आहे. मात्र नाट्यगृहाला सहमती दर्शविताना पालिकेने राज्य सरकारच्या आदेशावरून याठिकाणी असलेल्या एकूण खासगी जागेपैकी काही जागा वगळण्याचा निर्णय घेतला आहे. भांडुपच्या विकास आराखड्यात मौजे कांजूर येथील ११,७०० चौ. मी. चा भूखंड सांस्कृतिक केंद्र, नाट्यगृह किंवा सिनेमागृहासाठी आरक्षित आहे. सदर भूखंड मैदान, प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि १५.२५ मिटर रुंद विकास नियोजन रस्ता या आरक्षणाला लागून आहे. तसेच हा भूखंड औद्योगिक क्षेत्रात असून या जागेवर अतिक्रमण नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. सद्यस्थितीत हा भूखंड मोकळा आहे. या जागेच्या मालकाला आर्थिक भरपाईच्या बदल्यात चटईक्षेत्र निर्देशांक अथवा विकास हक्क हस्तांतरणाचा फायदा घेता येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. भूखंड संपादित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येथे नाट्यगृह बांधण्याचा प्रस्ताव मार्गी लागणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages