हे युगूल दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास किनाऱ्यापासून 150 ते 200 फुटांवर असलेल्या खडकावर बसले होते. त्याचवेळी अचानक आलेल्या उंच लाटेने त्यांना समुद्रात खेचून घेतले. स्थानिकांनी हा प्रसंग पाहताच पोलिसांच्या मदतीने शोध घेतला असता त्यांनी तरुणीला बाहेर काढले आणि खासगी वाहनाने भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
बेपत्ता युवकाचा कोळीबांधव, लाइफ गार्ड यांच्याकडून कसून शोध घेण्यात येत आहे. त्यांच्या मदतीला नेव्ही आणि कोस्टगार्डला पाचारण करण्यात आले. मात्र त्याचा शोध लागला नव्हता. दरम्यान भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या युवतीचे नाव प्रीती गुप्ता (20 वर्षे) असून तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
बॅण्डस्टॅण्ड किनाऱ्यानजीक समुद्रात खडकावर जाऊन बसणे धोकादायक आहे, अशा सूचनेचे फलक लावण्यात आले आहेत. मात्र पर्यटकांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने त्यांच्या जिवावर बेतते, असे स्थानिक कोळी बांधव आणि पोलिसांकडून सांगण्यात आले.
मुंबईतील वांद्रे बँडस्टँड हे प्रसिद्ध ठिकाण आहे. समुद्र किनाऱ्याचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी दररोज असंख्य लोक बसण्यासाठी येत असतात. यात तरुण मुला-मुलींचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. मुंबईची हवा खायची असेल तर मुंबईबाहेरील हजारो लोक या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी हमखास येत असतात.