कोल्हापूर दि. ४ ऑक्टोबर - शेतकऱ्यांच्या घामाची किंमत मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. मात्र तसं होत नाही. आज कांद्याची निर्यात थांबवली आहे. शेतकऱ्यांना पैसे मिळूच नये अशी भूमिका या सरकारची असून या सरकारला घरी पाठवण्याचे काम आपल्याला करायचं आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर येथील जाहीर सभेत केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार के. पी. पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत शरद पवार यांनी सरकार तोफ डागतानाच हे सरकार कसे सुडबुद्धीने वागत आहे याबाबतीत आपले विचार मांडले.
स्त्रियांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. खासदार स्वामी चिन्मयानंद यांनी एका कॉलेजच्या मुलीवर अत्याचार केले. भाजपचा खासदार अशी बाब करतो ही बेशर्मीची बाब आहे. त्या मुलीला न्याय तर मिळला नाही, उलट तिलाच अटक करण्यात आली. हे सरकार आपले नाही म्हणूनच आपल्याला परिवर्तन करायचं आहे असेही शरद पवार म्हणाले.
कोल्हापूरमध्ये नदीकडच्या पिकांची परिस्थिती काही नीट दिसली नाही. महापुरात ऊसाच्या शेंड्यावर पाणी जाऊन नुकसान झालं. सरकारमधील लोकांनी संकटकाळात सर्व ताकद तिथे लावायला पाहिजे होती. मात्र तसं झालं नाही. अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली शिवाय फक्त अर्धातास सांगलीत थांबलेल्या मुख्यमंत्र्यांनी फक्त हवाई पाहणी केली अशी जोरदार टीकाही केली.