मुंबई - लोकांनी लोकशाही जिवंत ठेवली याचा मला अभिमान आहे. जनतेने जो जनादेश दिला आहे, तो आमच्या डोळ्यात अंजन घालायला लावणारा आहे. या निकालानंतर आता कुणी ईव्हीएमवर प्रश्न विचारणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. तयावे ते बोलत होते.
जनतेने ज्या आशेने आणि अपेक्षेने आमच्याकडे राज्य दिले आहे, त्या अपेक्षा पुर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करु. निवडणुकीआधी भाजप-सेनेमध्ये १४४ – १४४ असा फॉर्म्युला ठरला होता. मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या काही अडचणी सांगितल्या होत्या, त्यामुळे आम्ही कमी जागा घेतल्या. मात्र यावेळी त्यांच्या आणखी काही अडचणी असतील तर मी समजून घेऊ शकत नाही, कारण मलाही माझा पक्ष चालवायचा आहे, अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली. भाजपला एकहाती सत्ता मिळवता आलेली नसल्यामुळे शिवसेना अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद घेणार का? असा प्रश्न पत्रकारांना विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, “निकालातून जनतेने डोळ्यात अंजन घातल्यानंतर अजूनही आम्ही डोळे चोळत चोळत जर मुख्यमंत्रीपदासाठी भांडत राहिलो तर ते काही योग्य होणार नाही. जनतेला चांगले सरकार देणे, हेच आमच्या समोरचे प्रमुख उद्देश आहे.”
ठाकरे घराण्यातील कोणीही थेट निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ होती. यासाठी शिवसेनेकडून वरळी मतदारसंघाची निवड करण्यात आली होती. या मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना 89248 मतदान झाले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना, आई वडील म्हणून आदित्यचा अभिमान वाटत असून, त्याला जनतेने दिलेल्या प्रेमासाठी मी नतमस्तक होत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. तसेच शरद पवार यांना राज्यभरातून मिळत असेलल्या प्रतिसादाबद्दल विचारल्यानंतर दुसऱ्याचे चांगले झाल्यास मला आनंदच आहे, असे ते म्हणाले. यामध्ये माझ्या पोटात दुखण्याचे कोणतेही कारण नसल्याच्या भावना ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.