मुंबई, दि. 21 : मुंबई शहर जिल्ह्याच्या सन 2020-2021 च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या 124 कोटी 11 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास व नियतव्ययास वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री अस्लम रमजान अली शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वाढविण्यासाठी वित्त मंत्री यांच्याकडे मागणी करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री शेख यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा वार्षिक नियोजन समितीची बैठक आज ग्रँट मेडिकल कॉलेज जिमखानामध्ये पालकमंत्री शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी प्रास्ताविक करून बैठकीची माहिती दिली.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2020-2021 या वर्षासाठी सर्वसाधारण योजनेसाठी 104 कोटी 72 लाख, अनुसुचित जाती उपयोजनेसाठी 19 कोटी 28 लाख आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजनेसाठी 11 लाख रुपये अशा एकूण 124 कोटी 11 लाख रुपयांच्या नियतव्यास या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2019-20 या वर्षात वाटप झालेल्या एकूण निधीपैकी डिसेंबर 2019 अखेरपर्यंत सर्वसाधारण योजनेत 115 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे तर अनुसुचित जाती उपयोजनेत 7 कोटी 91 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली असल्याचे जिल्हाधिकारी जोंधळे यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री श्री. शेख म्हणाले की, गेल्या वर्षीपेक्षा सन 2020-21 या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेसाठी 124 कोटी रु. ची वित्तीय मर्यादा शासनाकडून कळविली आहे. हा निधी वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी कामांचे प्रस्ताव सादर करावेत. वित्त मंत्री यांच्याशी चर्चा करून हा निधी वाढविण्यासाठी प्रयत्न करू. मुंबई ही देशातील पर्यटन क्षेत्रातील मोठे शहर आहे. हेरिटेज वॉक सारखे प्रकल्प उभारण्याची गरज आहे. त्यासंदर्भातही वेगळा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. मुंबई शहर जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एक दृष्टिकोन ठेवून काम करावे, असेही शेख यांनी सांगितले.
पर्यटन मंत्री ठाकरे यांनीही मुंबईचे पर्यटनातील स्थान पाहून विविध प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले.
शालेय शिक्षण मंत्री प्रा. गायकवाड यांनीही जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वाढवून मिळण्याची मागणी केली.
शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्ठाचार मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, राज्य नियोजन मंडळाचे राजेश क्षीरसागर आदी उपस्थित होते. यावेळी आमदार सदा सरवणकर, कालीदास कोळंबकर, किरण पावसकर, अमीन पटेल, तमीळ सेल्वन, राहुल नार्वेकर, आमदार श्रीमती मनिषा कायंदे, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड आदी यावेळी उपस्थित होते.