मुंबई दि.14 - लंडन मधील किंग हेन्री रोड वरील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयरुपी स्मारक निवासी जागेत असल्याने त्यावर स्थानिकांनी आक्षेप घेतला होता. निवासी जागेवर संग्रहालय आणि स्मारक उभारले असल्याने तेथील स्थानिक महापालिकेने आक्षेप घेतल्याने या स्मारकाची मान्यता धोक्यात आली होती. मात्र या प्रकरणी भारताकडून झालेल्या प्रयत्नामुळे लंडन सरकारने या प्रकरणी चौकशी समिती नेमली. त्या समितीने स्मारक ज्या जागेवर साकारण्यात आले आहे त्या निवासी जागेच्या लँड ऑफ युज मध्ये बदल करून स्मारकाला मान्यता दिली आहे. त्यामुळे लंडनमधील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावरील सर्व आक्षेप दूर झाले असल्याची माहिती रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.
लंडन मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला निवासी जागेत संग्रहालयरुपी स्मारक उभारल्या बद्दल स्थानिकांनी आक्षेप घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर या स्मारकाला अधिकृत मान्यता मीळण्यासाठी ना रामदास आठवले यांनी सतत केंद्र सरकार; भारताचे लंडन मधील उच्चायुक्त यांच्या मार्फत लंडन सरकार कडे पाठपुरावा केला होता. या वर्षी जानेवारी मध्ये खास लंडन चा दौरा करून लंडनमधील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी लंडन मधील भारताचे उच्चायुक्त रुची घनश्याम यांची भेट घेतली होती. स्मारकाच्या अधिकृत मान्यतेसाठी पाठपुरावा करून माहिती घेतली होती. त्या दौऱ्यात लंडन मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट देऊन तेथे 14 जानेवारी रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिन साजरा केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात रामदास आठवले यांनी केलेल्या अथक पाठपुराव्यामुळे लंडन मधील किंग हेन्री रोड वरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक लंडन सरकार ने अधिकृत केले आहे. हे स्मारक निवासी विभागात असल्याने त्यावर स्थानिकांनी आक्षेप घेतले होते. त्यामुळे या स्मारकाची मान्यता धोक्यात आली होती. मात्र भारत सरकार तर्फे ना रामदास आठवले यांनी पाठपुरावा केल्यामुळे लंडन सरकारने या स्मारकाच्या लँड ऑफ युझ मध्ये बदल करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संग्रहालयरुपी स्मारकाला अधिकृत मान्यता दिली आहे..