बैठकीला आयुक्तांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती राज्य शासनाच्या निर्देशानुसारच - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बैठकीला आयुक्तांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती राज्य शासनाच्या निर्देशानुसारच

Share This


मुंबई -- मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी गटनेत्यांच्या बैठकीस प्रत्यक्ष उपस्थितीत न राहता ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’ द्वारे भाग घेतल्याने पालिकेतील गटनेत्यांनी जोरदार टीका केली आहे. यावर पालिका आयुक्तांची कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती ही राज्य शासनाच्या निर्देशानुसारच असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

 कोरोनामुळे पालिकेत होणा-या वैधानिक व इतर समित्यांच्या सभा, सभागृह रद्द करण्यात आल्या आहेत. पाच महिन्यांत यातील एकही सभा भरवण्यात आलेली नाही. मात्र गटनेत्यांची सभा सोमवारी आयोजित करण्यात आली. या सभेला पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल हे प्रत्यक्ष उपस्थित न राहता ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहण्याचा आग्रह धरला. मात्र सर्वपक्षीय गटनेत्यांनी आयुक्तांच्या या मागणीला नकार दिला. मात्र आयुक्तही व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मिटींगच्या मागणीवर ठाम राहिले. त्यामुळे सर्वपक्षीय गटनेत्यांनी मिटिंगवर बहिष्कार टाकला. त्यामुळे ही सभाच होऊ शकली नाही. मात्र बैठकीला आयुक्तांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती ही राज्य शासनाच्या निर्देशानुसारच असल्याचे स्पष्टीकरण पालिका प्रशासनाने केले आहे. पालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या सभेमध्ये महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ द्वारे उपस्थिती लावली. राज्य शासनाच्या अधिसूचना क्रमांक कोरोना-२०/प्र. क्र. ७६/न. वि. १४ अन्वये महानगरपालिकेच्या विविध सभा ‘व्हि‍डिओ कॉन्फरन्स’द्वारेच घेण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. त्यात स्पष्टपणे नमूद केले आहे की, कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांनी सर्व बैठका केवळ ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारेच घ्याव्यात. ही अपवादात्मक परिस्थिती असल्यामुळे महापालिकेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱयांच्‍या बैठकाही या ‘व्हि‍डिओ कॉन्फरन्स’द्वारे घेण्यात येत आहेत. कोरोना महामारीत शासनाने आणि महानगरपालिकेने विविध तज्ञ मान्यवरांच्या समित्या गठित केल्या असून, या समित्यांच्या बैठकाही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केल्या जातात.

शासनाच्या निर्देशांचे परिपूर्ण पालन करून महानगरपालिका आयुक्त चहल यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे गटनेत्यांच्या बैठकीला उपस्थिती लावली होती. महापालिका आयुक्तांना लोकप्रतिनिधी बद्दल पूर्णतः आदर आहे. त्यांच्या बैठकीस महापालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष उपस्थित राहण्यात टाळाटाळ केली, या आरोपात कोणतेही तथ्य नाही, असे महानगरपालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages