एका राजा बिनडोक, दुसरा राजा... प्रकाश आंबेडकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS

०८ ऑक्टोबर २०२०

एका राजा बिनडोक, दुसरा राजा... प्रकाश आंबेडकर


मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील मराठा संघटनांनी १० ऑक्टोबर रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. ही भूमिका मांडतानाच आंबेडकरांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेणारे खासदार उदयनराजे भोसले व संभाजीराजे भोसले यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

मराठा आरक्षणासाठी सध्या उदयनराजे भोसले व संभाजीराजे भोसले हिरीरीनं भूमिका मांडत आहेत. या दोघांनीच आंदोलनाचं नेतृत्व करावं, अशी काही लोकांची मागणी आहे. वंचित बहुजन आघाडीला दोन्ही राजांच्या नेतृत्वाबाबत काय वाटतं, असा प्रश्न आंबेडकर यांना विचारण्यात आला होता. त्यावर आंबेडकर यांनी परखड भूमिका मांडली. 'दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे असं मी कुठंही ऐकलेलं नाही. एक राजा तर बिनडोक आहे. त्यांना घटनाच माहीत नाही. आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा अशी भूमिका घेणाऱ्या माणसाला भाजपनं राज्यसभेतच कसं पाठवलं हा प्रश्न पडतो,' असा टोला आंबेडकर यांनी उदयनराजे भोसले यांना हाणला. उदयनराजेंना बिनडोक म्हणून तुम्ही त्यांना थेट अंगावर घेत आहात असं विचारलं असता, 'मी कोणालाही भ्यायलो नाही, भीत नाही,' असं ते म्हणाले.

संभाजीराजेंबद्दलही त्यांनी मत मांडलं. 'संभाजीराजेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका घेतलीय पण ते इतर गोष्टींवर अधिक भर देताहेत असं दिसत असल्याचं आंबेडकर म्हणाले.

सामंजस्य बिघडताना दिसतंय!
मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळं महाराष्ट्रातील सामंजस्य मला बिघडताना दिसतंय. सरकार कुठलीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत थांबा, असं सरकारचं म्हणणं आहे. मात्र, संघटना आक्रमक आहेत. त्यातून विविध संघटनांमध्ये कलह निर्माण होण्याची शक्यता दिसतेय. महाराष्ट्रातील सामंजस्य कुठेही बिघडू नये असं आम्हाला वाटतं. आरक्षणाचा मुद्दा बाजूला पडून भलत्याच गोष्टींवर चर्चा सुरू आहे. मुख्य मुद्दा केंद्रस्थानी आणण्यासाठीच हा बंद आहे. आम्ही आधीच आरक्षणाला पाठिंबा दिल्यामुळं बंदलाही आमचा पाठिंबा आहे,' असं आंबेडकर म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

JPN NEWS