सर्व प्रवाशांसाठी लोकल प्रवासाचा प्रस्ताव, रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सर्व प्रवाशांसाठी लोकल प्रवासाचा प्रस्ताव, रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद

Share This



मुंबई - उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर सध्या विशेष लोकल धावत आहेत. अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही लोकलसेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यात बदल करण्यात आला. खासगी व सहकारी बँकांतील कर्मचारी, त्यानंतर महिला प्रवासी, वकील, खासगी सुरक्षा रक्षक यांनाही आता लोकलची दारे काही अटींसह उघडण्यात आली आहेत. त्यानंतर आज राज्य सरकारने सर्वात मोठे पाऊल उचलत सर्व प्रवाशांसाठी लोकल प्रवासाचा प्रस्ताव रेल्वेपुढे ठेवला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक तसेच मुंबईचे पोलीस आयुक्त यांना हा प्रस्ताव देण्यात आला आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत आणि पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी हा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाला मध्य रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

करोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून मुंबई उपनगरीय लोकलच्या फेऱ्या वाढवण्यास रेल्वे नेहमीच तत्पर आहे. लोकल सर्व प्रवाशांसाठी खुली व्हावी म्हणून आम्ही प्राधान्याने योजना तयार करत आहोत. राज्य सरकारसोबत याबाबत आम्ही सतत संपर्कात आहोत आणि लवकरच यावर अंतिम निर्णय होऊन अतिरिक्त लोकल सोडण्यात येतील, अशा आशयाचे ट्वीट मध्य रेल्वेने केले आहे

राज्य सरकारचा प्रस्ताव...
कोविड-१९ च्या अनुषंगाने असलेले नियम पाळून सर्व प्रवाशांना लोकल प्रवास करण्याची मुभा द्यावी.
- वैध तिकीट किंवा पास असलेला कोणताही प्रवासी सकाळी ७.३० च्या आधी लोकलने प्रवास करू शकतात.
- सकाळी ८ ते १०.३० या वेळेत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी (वैध क्यू आर कोड असेल तरच) तसेच आयकार्ड व वैध तिकीट वा पास असणारी व्यक्ती प्रवास करू शकतो.
- सकाळी ११ ते दुपारी ४.३० पर्यंत वैध तिकीट वा पास असलेला कोणताही प्रवासी प्रवास करू शकतो.
- संध्याकाळी ५ ते ७.३० वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी (वैध क्यू आर कोड असेल तरच) तसेच आयकार्ड व वैध तिकीट वा पास असणारी व्यक्ती प्रवास करू शकते.
- रात्री ८ वाजल्यानंतर शेवटच्या लोकलपर्यंत तिकीट वा पास असलेली कोणतीही व्यक्ती लोकलने प्रवास करू शकते.
- दरतासाला एक महिला विशेष लोकल सोडण्यात यावी.
- मागणीनुसार संभाव्य गर्दी टाळण्यासाठी लोकलची संख्या वाढवण्याचे नियोजन करावे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages