लालबाग गॅस सिलिंडर दुर्घटना - मृतांची संख्या नऊवर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS

२५ डिसेंबर २०२०

लालबाग गॅस सिलिंडर दुर्घटना - मृतांची संख्या नऊवर



मुंबई - लालबाग येथील साराभाई इमारतीत ६ डिसेंबर रोजी गॅस सिलिंडर स्फोटात १६ जण जखमी झाले होते. या दुर्घटनेतील प्रकृती गंभीर असलेल्या एका रुग्णाचा मसिना रुग्णालयात आज मृत्यू झाला. यामुळे मृतांची संख्या नऊवर पोहचली आहे. ९ पैकी ७ मृत्यू केईएम रुग्णालयात तर २ मृत्यू मसिना रुग्णालयात झाले आहेत.

लालबाग, साराभाई इमारतीत राहणारे मंगेश राणे यांच्या घरात मुलीचे लग्नकार्य होते. ६ डिसेंबर रोजी हळदीचा कार्यक्रम होता. त्यासाठी सकाळच्या सुमारास जेवण बनवले जाणार होते. मात्र रात्रीपासून गॅस गळती झाल्याने गॅस पेटवताच सिलेंडरचा स्फोट होऊन १६ जण जखमी झाले होते. त्यापैकी गंभीर जखमी सुशीला बांगरे (६२) आणि करीम (४५) यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला होता.

शुक्रवार ११ डिसेंबर रोजी सकाळी ९.१५ वाजता मंगेश राणे (६१), सकाळी ९.२५ वाजता ज्ञानदेव सावंत (८५) यांचा तर दुपारी १.३० वाजता महेश मुणगे (५६) यांचा अशा तीन जणांचा मृत्यू एकाच दिवशी झाला होता. त्यामुळे मृतांची संख्या ५ वर गेली होती. त्यानंतर १२ डिसेंबरला सायंकाळी ७.४५ वाजता विनायक शिंदे (४७) यांचा केईएम रुग्णालयात मृत्यू झाल्याने मृतांची आकडेवारी ६ वर पोहचली. १४ डिसेंबरला मध्यरात्री रोशन अंधारे व १५ डिसेंबरला मध्यरात्री सूर्यकांत अंबिके यांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ८ वर पोहचला होता. आज २५ डिसेंबरला सायंकाळी ४.२० वाजता बिपीन (५०) यांचा मसिना रुग्णालयात मृत्यू झाला आहे. यामुळे लालबाग दुर्घटनेतील मृतांचा आकडा ९ वर पोहचला आहे.

लालबाग गॅस सिलेंडर स्फोटातील १० पैकी १० जखमींना केईएम तर ६ जखमींना मसिना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. केईम रुग्णालयात १० पैकी ७ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मसिना रुग्णालयात दाखल केलेल्या ६ जखमींपैकी २ जणांचा मृत्यू झाला आहे, तर एका रुग्णाची प्रकृती गंभीर आहे. तसेच आणखी तीन रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

JPN NEWS