
मुंबईः मार्चपासून पालिकेकडून करोनाविरोधातील लढ्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत असून त्यात आणखी खर्चासाठी आकस्मिक खर्चातील ४०० कोटी रुपयांचा निधी वळविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मांडण्यात आला. यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी महापालिकेवर जोरदार टीका करतानाच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई पालिकेचे करोनावर ६ महिन्यात १६०० कोटी रुपये खर्च (झाले) तरी अजून ४०० कोटी हवे असे पालिका म्हणतेय.. पण झालेल्या खर्चाचा हिशेब का देत नाही? महापौरांच्या मुलाला आणि जावयाला किती मिळाले? सॅनिटायझर पुरवणाऱ्या बोगस कंपन्यांच्या घशात किती घातले? पर्यावरण प्रेमी वरळीला किती गेले? ४०० कोटी रुपये मागणीच्या प्रस्ताव परत पाठवा अशी सूचना स्थायी समितीत भाजपाच्या नगरसेवकांनी मांडली. तो शिवसेनेने नामंजूर का केला? का लपवाछपवी करताय? हिशेब द्या, अशी मागणी शेलार यांनी केली आहे.
मुंबईकर करोनाने दगावले मात्र पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी करोना काळात आपले गोदाम भ्रष्टाचार करुन भरले?, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
मुंबईत करोना प्रादुर्भाव रोखताना पालिकेवर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. सद्यस्थितीत वेगवेगळ्या उपायांनी करोनावर नियंत्रण मिळविण्यात यश येत आहे. मात्र, त्यामुळे पालिकेच्या आकस्मिक निधीच्या वापरातही मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. करोना लढ्यासाठी पालिकेने लागलीच आकस्मिक निधीची तरतूद करण्याचा निर्णय घेतला. नानाविध रुग्णालयांसह सर्व २४ विभागांमध्ये विलगीकरण कक्ष उभारण्यासह कंत्राटी स्तरावर अलगीकरण कक्षात डॉक्टर नेमण्यासह चाचण्या, प्रयोगशाळांची क्षमतावाढ, नव्या प्रयोगशाळा उभारणे आदींसाठी खर्च करण्यात आला आहे.
या सर्व टप्प्यात आवश्यक खर्चासाठीचा निधी संपुष्टात आल्यावर पालिकेच्या अर्थसंकल्पातील १,६४४ कोटी रुपये शिलकीच्या निधीतून ४५० कोटी आकस्मिक निधीत वळवले गेले. परंतु, कालांतराने ही रक्कमही खर्ची पडल्यानंतर पालिकेच्या वित्त विभागाने अतिरिक्त ४०० कोटी रुपयांची मागणी स्थायी समितीकडे केली आहे.

No comments:
Post a Comment