मुंबई - राणीबागेत लवकरच गुजरात, इंदूरमधील प्राणिसंग्रहालयातून फेब्रवारीमध्ये सिंह, अस्वल, लांडगा आणला जाणार आहे. थायलंडमधून झेब्राच्या दोन जोड्या संबंधित प्राणीसंग्रहालयांना त्या बदल्यात देण्याचा करार मुंबई मनपाने केला आहे.
वीर जिजामाता भोसले उद्यान हे मुंबईचे वैभव आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे भेटी देतात. गर्दीने घुसमटलेल्या मुंबईकरांचे हे विरंगुळ्याचे हक्काचे ठिकाण आहे.परदेशी पेंग्विन, वाघ, बिबट्या, कोल्हे, अस्वल, देशी-विदेशी शंभर प्रकारचे पक्षी आणले आहेत. प्राणी - पक्षांमुळे पर्यटक, मुंबईकरांचे आकर्षण वाढले आहे. सध्या राणीबागेचा कायापालट सुरु आहे. अत्याधुनिक सुधारणा आणि सौंदर्यीकरणावर भर दिला आहे. यातील पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली आहेत. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये विविध प्राण्यांकरिता पिंजरे बांधली जात आहेत.
गुजरातमधील जुनागढ येथील साकरबाग प्राणिसंगहालय आणि कमला नेहरु प्राणिसंग्रहालयातून प्रत्येकी एक प्रख्यात आशियाई सिंहाची जोडी आणली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राणीबागेत पिंजऱ्याचे बांधकाम सुरु आहे. लपण्यासाठी छोटी झुडपे, सावलीच्या जागा, मोठी झाडे, पाण्याचा छोटा जलाशय, तसेच बसण्याकरिता मोठे दगडांची व्यवस्था केली जाणार आहे. तर प्रदर्शनासाठी गीर 'मलधारी' आदिवासी प्रजातींच्या घरांची रचना केली आहे. आशियाई सिंहाची एका जोडीच्या बदल्यात साकरबाग प्राणिसंग्रहालयाला एक झेब्रा जोडी दिली जाणार आहे. तर इंदूरमधील कमला नेहरु प्राणिसंग्रहालयाला एक झेब्रा जोडी देऊन त्यांच्याकडून अस्वल, सिंह आणि लांडगा या तीन प्रजातींच्या प्रत्येकी एक जोडी घेण्याचा निर्णय मुंबई मनपाने घेतला आहे.
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला तसा पत्रव्यवहार केला आहे. मे. गोवाट्रेड फार्मिंग कंपनी लि. थायलंड या कंपनीला हे काम अटी- शर्तीच्या धर्तीवर दिले आहे. संबंधित कंपनी गुजरात आणि इंदूरसह राणीबागेत सुस्थितीत प्राणी पोहचवण्याचे काम करेल. मात्र, त्याकरिता ८४ लाख ६८ हजार १९६ रुपये करार देण्याचा पालिकेने करार केला आहे. स्थायी समितीच्या पटलावर या संदर्भातील प्रस्ताव मंजूरीसाठी येणार आहे.
अशा आहेत अटी- शर्ती
झेब्राच्या दोन जोड्या ( एक नर- एक मादी) ६ महिन्यांच्या कालावधीत परदेशातून आयात कराव्या लागतील. त्यापैकी एक जोडी गुजरात आणि एक जोडी इंदूर प्राणिसंग्रहालयाला द्यावी लागेल. राणीबागेलाही याच कालावधीत सिंह, लांगडा आणि अस्वलची एक जोडी देण्याचा करार झाला आहे. करारनुसार ५० टक्के रक्कम पहिली तर उर्वरित संबंधित प्राण्यांची देवाण- घेवाण पूर्ण झाल्यावर दिली जाणार आहे. साकरबाग प्राणिसंग्रहालयाला १० फेब्रवारी २०२१ पर्यंत प्राण्यांचा पुरवठा करण्याबाबत कालावधी निश्चित केला आहे.
No comments:
Post a Comment