आत्मनिर्भर भारता’चा संकल्प करा ! - पंतप्रधान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 December 2020

आत्मनिर्भर भारता’चा संकल्प करा ! - पंतप्रधान



नवी दिल्ली - चार दिवसांनंतर नवे वर्ष सुरू होणार आहे. पुढच्या वर्षी पुढची ‘मन की बात’ होईल. देशात नवे सामर्थ्य निर्माण झाले आहे. या नव्या सामर्थ्याचे नाव आहे, ‘आत्मनिर्भर’. देशात निर्माण होणा-या खेळण्यांची मागणी वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून रविवारी देशवासीयांशी संवाद साधला. मोदी यांनी देशभरातून नागरिकांनी पाठवलेल्या पत्रांचा उल्लेख करत जनता कर्फ्यू, कोरोना, आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल यासह विविध मुद्यांवर भाष्य केलं. भारतात तयार होणा-या वस्तू जागतिक दर्जाच्या असाव्यात असं म्हणत उद्योगपतींनी पुढे येण्याचं आवाहन केलं. यावेळी पंतप्रधानांनी देशवासीयांना नव्या वर्षानिमित्त आत्मनिर्भर भारताचा संकल्प करण्याचं आवाहन केलं आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, मला अनेक देशवासियांचे पत्र मिळाले आहेत. अधिकांश पत्रांत लोकांनी देशाचे सामर्थ्य आणि देशवासियांच्या ऐक्याच्या शक्तीचे कौतुक केले आहे. जनता कर्फ्यूसारखा अभिनव प्रयोग पूर्ण जगाला प्रेरणा देणारा ठरला. टाळ्या आणि थाळ्या वाजवून देशानं कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला. एकजुट दाखवली, हेदेखील लोकांनी लक्षात ठेवले आहे, असं मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले, देशातील सामान्य जनतेने देशाच्या सन्मानार्थ हा बदल अनुभवला आहे. मी देशात आशेचा एक अद्भूत प्रवाहदेखील पाहिला आहे. अनेक आव्हाने आली, संकटे आली, कोरोनामुळे जगातील सप्लाय चेनमध्येही अनेक अडथळे आले. मात्र, प्रत्येक संकटापासून आपण नवा धडा घेतला.

मोदी म्हणाले, व्होकल फॉर लोकलची भावना देशातील नागरिकांनी दृढ करण्याची गरज आहे. हे आपल्याला वाढवत राहायचं आहे. प्रत्येकजण नव्या वर्षात काही संकल्प करतो. यावेळी देशासाठी हा एक संकल्प आवश्यक करावा. मी आधीही बोललो आहे. मी पुन्हा एकदा आग्रह करतो की, आपण एक यादी बनवावी. दिवसभर आपण ज्या गोष्टी घेतो. त्यामध्ये नकळतपणे विदेशात तयार होणा-या वस्तू तर घेत नाही ना? यासाठी त्या वस्तूची भारतात तयार झालेल्या पर्यायी वस्तूची माहिती घ्या. ती वस्तू भारतात तयार होईल, यासाठी प्रयत्न करा, असं आवाहन मोदी यांनी केलं आहे.

मोदींच्या भाषणातील मुख्य मुद्दे -
देशातील हजारो वर्ष जुनी संस्कृती, परंपरा वाचविण्यासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे, आजचा दिवस त्याचे स्मरण करण्याचा आहे. श्री गुरु गोविंदसिंग जी यांच्या कुटुंबाने दिलेल्या बलिदानाने संपूर्ण मानवतेला, देशाला एक नवीन शिकवण दिली, आपली संस्कृती सुरक्षित ठेवण्याचे मोठे कार्य केले.

२०१४ ते १८ दरम्यान भारतातील बिबट्यांची संख्या ६० टक्क्यांहून अधिक वाढली आहे. २०१४ मध्ये देशात बिबट्यांची संख्या सुमारे ७,९०० होती, तर २०१९ मध्ये ही संख्या वाढून १२,८५२ झाली. देशातील ब-याच राज्यांत, विशेषत: मध्य भारतात, बिबट्यांची संख्या वाढली आहे. बिबट्यांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यात मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र अव्वल स्थानी आहेत. ही एक मोठी कामगिरी आहे. अनेक वर्षांपासून जगभरात बिबट्याला अनेक धोक्यांना सामोरे जावे लागत आहे, जगभरातील त्यांचे वास्तव्य धोक्यात आले होते. अशा वेळी बिबट्यांची संख्या सातत्याने वाढवून भारताने संपूर्ण जगाला एक मार्ग दाखविला आहे.

गेल्या काही वर्षांत भारतातील सिंहांची, वाघांची संख्याही वाढली, वनक्षेत्रही वाढले. सरकारसोबत बरेच लोक, आणि संस्थाही वृक्ष आणि वन्यजीव यांच्या संरक्षणामध्ये सहभागी झाल्याने हे शक्य झाले आहे. हे सर्व अभिनंदनास पात्र आहेत.

देशातील युवकांना पाहिल्यानंतर मला आनंदी आणि आश्वस्त जाणवतं. देशातील युवकांपुढच कोणतंही आव्हान मोठं नाही. करू शकतो, करेन ही भावना त्यांच्यामध्ये आहे. याचबरोबर देशभरात कोरोनाच्या या काळात शिक्षकांनी ज्या अभिनव पद्धती अवलंबल्या, अभ्यासक्रमाची सामुग्री सृजनात्मकरित्या तयार केली. ती ऑनलाईन शिक्षणाच्या या काळात अमूल्य आहे.

काश्मिरी केशर प्रामुख्याने पुलवामा, बडगाम आणि किश्तवाड़ सारख्या ठिकाणी उगवलं जातं. याच वर्षी मे महिन्यात काश्मिरी केशरला भौगोलिक संकेत टॅग म्हणजेच जीओ टॅग देण्यात आले. याच्या माध्यमातून आपण काश्मिरी केशराला एक जागतिक लोकप्रिय ब्रँड बनवू इच्छितो. त्यामुळे केशर उत्पादकांना अधिक चांगला मोबदला मिळण्याचीही शक्यता दिसू लागली आहे.

महाराष्ट्रातील पत्रलेखकांचे कौतुक -
यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या अंजली आणि मुंबईच्या अभिषेक यांनी पाठवलेल्या संदेशाचं वाचन करत मोदी यांनी त्यांचं कौतुक केलं. अंजली यांनी कोल्हापूरहून लिहिले आहे की, आपण नेहमीच एकमेकांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा देतो, पण यावेळी आपण आपल्या देशाला शुभेच्छा देऊया, त्याचे अभिनंदन करूया, असं मोदींनी म्हटलं. तर मुंबईच्या अभिषेक यांनी नमोअ‍ॅप वर एक संदेश पाठवला आहे. त्यांनी लिहिले आहे की २०२० ने आम्हाला जे काही दाखवले, जे शिकवले त्याचा कधी विचार देखील केला नव्हता. त्यांनी कोरोनाशी संबंधित सर्व गोष्टी लिहिल्या आहेत, असं मोदी यांनी सांगितलं.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad