जालना: औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करण्यास महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने ठामपणे विरोध केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावर अत्यंत स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. त्यानंतर आज माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे राज्यातील आणखी एक प्रमुख नेते अशोक चव्हाण यांनीही औरंगाबादच्या नामांतरास काँग्रेसचा विरोधच राहील, असे सांगितले.
औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच या शहराच्या नामांतरावरून वादळ उठलं आहे. औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करण्याबाबत सत्ताधारी शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला असताना काँग्रेसने मात्र या नामांतरास ठाम विरोध केला आहे. यावरून शुक्रवारी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही पक्षांवर टोलेबाजी केली होती. शिवसेना केवळ निवडणुकीपुरता या मुद्द्याचा वापर करत आली आहे. आताही तेच सुरू आहे. आम्ही मागणी करतो आणि तुम्ही विरोध करा, अशा पद्धतीने राज्यात सत्तेत असलेल्या या दोन्ही पक्षांची नुरा कुस्ती चालली आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला होता. त्यावर आज काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले.
औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांत कोणतीही नुरा कुस्ती चाललेली नाही, असे नमूद करताना औरंगाबादच्या नामांतरास आमचा विरोध होता आणि यापुढेही राहील, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. औरंगाबादचे नामांतर हा महाविकास आघाडी सरकारच्या समान किमान कार्यक्रमाचा भाग नाही. औरंगाबादचे नामांतर हा स्थानिक पातळीवरचा मुद्दा आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही, याकडेही अशोक चव्हाण यांनी लक्ष वेधले.
नावं बदलली म्हणून विकासाचे प्रश्न सुटत नाहीत -
'शहरांची नावं बदलली म्हणून विकासाचे प्रश्न सुटत नाहीत. काँग्रेस पक्षाचा भर जनतेचे प्रश्न सोडवण्यावर तसेच विकासाची काम करण्यावर आहे. औरंगाबादचे नाव बदलण्याचा विषय अद्याप चर्चेसाठी आलेला नाही. ज्यावेळी समन्वय समितीमध्ये हा विषय चर्चेला येईल तेव्हा काँग्रेस आपली भूमिका मांडेल परंतु, नाव बदलण्यास काँग्रेस पक्षाचा ठाम विरोध आहे', असे बाळासाहेब थोरात यांनी नमूद केले होते. राज्यातील तीन पक्षांचे सरकार हे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आले आहे. हे सरकार किमान समान कार्यक्रमावर चालते आहे. यात शहरांची नावं बदलण्याचा मुद्दा नाही. घटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेवर आलो आहोत. त्या घटनेतील तत्वाला बाधा येईल असा निर्णय घेतला जाणार नाही, असेही थोरात म्हणाले होते. चव्हाण यांनीही तोच सूर आळवला.
No comments:
Post a Comment