
मुंबई - पालिकेतील काँग्रेसच्या नगरसेविका व राज्यातील मंत्री अस्लम शेख यांच्या बहीण कमरजहा सिद्दीकी यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची नोटीस पालिकेच्या चिटणीस विभागाने दिली आहे. हे चिटणिसांना हाताशी धरून स्थायी समितीकडून षडयंत्र रचल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे.
काँग्रेसच्या नगरसेविका कमरजहा सिद्दीकी यांना सलग तीन महिने पालिका सभांना गैरहजर राहिल्याने, तुमचे नगरसेवक पद रद्द होईल, अशी नोटीस पालिकेच्या चिटणीस विभागाने पाठविली आहे. वास्तविक पाहता १८ नोव्हेंबर रोजी सिद्दीकी यांनी सुट्टीसाठी पत्र पाठवले होते. मात्र, ते पत्र डिसेंबर महिन्याच्या कार्यक्रम पत्रिकेवर न घेता त्यांना ५ जानेवारीला ऑनलाइन सभागृहात उपस्थित न राहिल्यास, तुमचे पद रद्द करू, अशी नोटीस चिटणीस विभागाने पाठवली. चिटणीस या स्थायी समितीच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांनी आमच्या नगरसेविकेचे पद रद्द करण्याचे षडयंत्र रचले आहे, असा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला. या विरोधात पालिका आयुक्तांना पत्र देऊन चिटणीसांना निलंबित करण्याची मागणी केल्याचे रवी राजा यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा