राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून भंडारा सामान्य रुग्णालयाची पाहणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 January 2021

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून भंडारा सामान्य रुग्णालयाची पाहणी



भंडारा, दि. 13 : जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा बालकांचा झालेला मृत्यू अत्यंत क्लेशदायक आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात, असे निर्देश देतानाच प्रत्येक मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथील सामान्य रुग्णालयाच्या पाहणीनंतर सांगितले.

राज्यपाल कोश्यारी यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घडलेल्या घटनेसंदर्भात माहिती घेतली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, खासदार सुनिल मेंढे, आमदार परिणय फुके, नरेंद्र भोंडेकर, राजु कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव आदी उपस्थित होते.

गेल्या शनिवारी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुणालयातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षाला लागलेल्या आगीत दहा बालकांचा मृत्यू झाला होता. तसेच सात बालकांना सुरक्षितपणे वाचविण्यात आले. वाचलेल्या बालकांच्या कक्षाला राज्यपाल कोश्यारी यांनी भेट देऊन शिशूंच्या मातांसोबत संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. बालक व मातांची योग्य काळजी घेण्याची सूचना यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना केली. त्यानंतर दुर्घटनाग्रस्त आयसीयु कक्षाला भेट दिली. ही पाहणी केल्यानंतर कोश्यारी यांनी या घटनेत मृत पावलेल्या प्रत्येक बालकांच्या कुटुंबियांना स्वेच्छानिधीतून दोन लाख रुपये मदत देण्यासंदर्भात सूचना दिल्या.

तत्पूर्वी राज्यपालांचे सकाळी येथील विश्रामगृहावर आगमन झाले. जिल्हाधिकारी संदीप कदम व जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्याकडून त्यांनी रुग्णालयातील आगीच्या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती घेतली. विविध संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी राज्यपालांना भेटून या घटनेसंदर्भात निवेदन दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad