मुंबई - हनुमानाने ज्या प्रमाणे संजीवनी पर्वत उचलून आणला, त्याचप्रमाणे कोरोनावर मात करण्यासाठी लस रुपाने संजीवनी आली आहे. ही लस घेतल्याने कोरोनासह अनेक व्हायरसचा सामना करण्यासाठी आपल्यात रोग प्रतिकार शक्ती तयार होईल. लसीने कोरोनाचा खात्मा होणार आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
कोरोनाचा सामना करण्यासाठी आज पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली कोव्हिशिल्ड लस मुंबईत आणण्यात आली, त्या पार्श्वभूमीवर महापौर बोलत होत्या. यावेळी बोलताना गेल्या मार्च महिन्यात कोरोनामुळे सर्व बंद होते. त्यामुळे गुढीपाडवा आपण साजरा केला नाही पण यावेळेस आपण लसीकरण करून मोठ्या मोठ्या गुढ्या उभारू, असे महापौरांनी म्हटले आहे. सीरमच्या लसीने कोरोनाचा खात्मा होणार आहे, असेही महापौरांनी म्हटले आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीट पार पाडली आहे. आता ही जबाबदारी पार पाडायची आपली वेळ आहे. तज्ज्ञ डॉक्टर आहेत, पालिकेने 5 हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. अजून 10 हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा मानस आहे, असे महापौरांनी सांगितले.
मुंबईत 1 लाख 39 हजार 500 डोसचा साठा आला आहे. उणे 2 डिग्री ते 8 डिग्री सेल्सियसमध्ये ही लस ठेवण्यात येईल. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर, तिसऱ्या टप्प्यात वयोवृद्ध आजार असलेले नागरिक तसेच दहा वर्षाखालील मुलांना ही लस दिली जाणार आहे. आतापर्यंत 1 लाख 30 हजार लस घेणाऱ्यांची नोंदणी झालेली आहे. येत्या 16 जानेवारीपासून मुंबईमधील 9 लसीकरण केंद्रावर लस दिली जाणार आहे, अशी माहिती महापौरांनी दिली. आता लस परेलला पालिका कार्यालयात ठेवण्यात आली आहे. कांजूर येथील कोल्डस्टोरेजचे काम पूर्ण झाल्यावर लस तिथे साठवली जाईल असे महापौरांनी सांगितले.
'अफवा पसरवू नका' -
जागतिक आरोग्य संघटना आणि आयसीएमआरच्या मान्यतेने हे लसीकरण होत आहे त्यामुळे नागरिकांनी पुढे येऊन लस घेतली पाहिजे, असे आवाहन महापौरांनी केले. काही लोक अफवा पसरवत आहेत, कोणीही अफवा पसरवू नये, असे आवाहनही महापौरांनी केले.
असे होईल लसीकरण -
पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड लसीचे 1 लाख 39 हजार 500 डोस मुंबईला आले आहेत. 16 जानेवारीपासून 9 केंद्रावर लसीकरण शनिवारी केले जाईल. त्याआधी लसी लसीकरण केंद्रावर पोहोचवल्या जातील. ज्या केंद्रावर ड्राय रन झाले नाही, त्या केंद्रावर आम्ही 15 जानेवारीला ड्राय रन घेण्याचे आयोजन करत आहोत. लस घेताना 12 प्रकारचे ओळखपत्र दाखवून लस घेता येईल. लसीकरण झाल्यावर 30 मिनिट तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली लस घेणारे लाभार्थी असतील. घरी जाऊन काही साईड इफेक्ट आढळले तर पालिकेशी किंवा जवळच्या लसीकरण सेंटरला कॉल करून मदत घेता येईल असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
कोल्डस्टोरेज दोन दिवसात पूर्ण होईल
सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. लस आली असली तरी सामाजिक अंतर ठेवण, मास्क वापरण हे बंधनकारक असेल हे आपल्या जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. लसीकरणावेळी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. एका शहराला एकाच कंपनीचे लस देण्यात येणार आहे. सिरमची आता आपल्याला लस आली आहे तर दुसऱ्या कंपनीची लस येणार नाही. पहिल्या टप्यात येणारी लस मुंबईसाठी पुरीशी असेल. लसीच्या साठ्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला जाईल. कांजूर येथील कोल्डस्टोरेजचे काम येत्या दोन दिवसात पूर्ण होईल. 10 लाखापेक्षा जास्त लस आली तर कांजूरमार्गला साठवली जाईल. परळ येथुन लसीकरण केली जाणारी 9 केंद्र 15 मिनिटांच्या अंतरावर असल्याने या ठिकाणी लस ठेवल्याचे काकाणी यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment