मुंबई - देशातील काही राज्यांत सध्या बर्ड फ्लूनं शिरकाव केला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. तर, मुंबई, ठाण्यात अनेक कावळे व अन्य पक्षांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळं उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मुंबईकरांमधील ही भीती लक्षात महापालिकेनं पत्रक काढलं आहे. त्याद्वारे जनतेच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बर्ड फ्लूपासून काळजी कशी घ्यायची, याचीही माहिती देण्यात आली आहे.
बर्ड फ्लू म्हणजे काय?
बर्ड फ्लू हा पक्ष्यांमधील विषाणूजन्य रोग असून तो ऑर्थोमिक्झो विरीडे (H5N1) या विषाणू कुटुंबातील 'अ' गटामुळे होतो.
हा रोग कोणत्या प्रकारच्या पक्ष्यांमध्ये व प्राण्यांमध्ये आढळतो?
हा विषाणू कावळे, बदके, कबुतरे, टर्की, कोंबड्या यांमध्ये प्रामुख्याने आढळतो.
ह्या रोगाचा प्रसार कसा होतो?
बाधित पक्ष्याच्या नाकातील स्त्राव किंवा विष्ठा यांच्याशी निरोगी पक्ष्यांचा थेट संबंध आल्यास हा रोग होऊ शकतो. दूषित खाद्य, पाणी, उपकरणे यांमुळं सुद्धा हा रोग पसरू शकतो. पक्षी एकमेकांच्या सान्निध्यात आल्यामुळं सुद्धा हा रोग होऊ शकतो.
बर्ड फ्लू हा माणसांमध्ये आढळतो का?
बर्ड फ्लू या रोगाच्या विषाणूचा प्रादुर्भाव प्रामुख्याने पक्ष्यांमध्ये व डुकरांमध्ये आढळतो. या व्यतिरिक्त इतर प्राणी वा माणसांमध्ये हा विषाणू सहसा आढळत नाही.
कोंबडीचे मांस खाल्ल्यामुळे या रोगाचा प्रसार माणसांमध्ये होतो का?
नाही. कारण, भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये चिकन, मटण, अंडी व इतर मांस उकडवून, शिजवून खाल्ले जाते. त्यामुळं या तापमानाला हा विषाणू जिवंत राहू शकत नाही.
कोंबडीची अंडी खाल्ल्यामुळे हा रोग होऊ शकतो का?
अंडी उकडून खाल्ली जातात. त्या तापमानाला हे विषाणू जिवंत राहू शकत नाहीत. त्यामुळे उकडलेली अंडी खाल्ल्यामुळे हा रोग होऊ शकत नाही.
परिसरात मृत पक्षी आढळल्यास काय करावे?
आपल्या परिसरात मृत पक्षी आढळल्यास त्वरीत याची माहिती १९१६ या संपर्क क्रमांकावर महापालिकेला द्यावी.
चिकन व अंडी विक्रेते यांनी काय काळजी घ्यावी?
चिकन व अंडी विक्रेत्यांनी आपल्या दुकानांची जैवसुरक्षा यंत्रणा सक्षम करावी.दुकानात दररोज स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे.जिवंत पक्ष्यांना हाताळताना मास्क व ग्लोव्हजचा वापर करावा. खुराड्यांची संपूर्ण स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे. निर्जंतुकीकरणासाठी एक लिटर पाण्यामध्ये ७ ग्रॅम धुण्याचा सोडा (सोडियम कार्बोनेट) किंवा सोडियम हायपोक्लोराइड/चुनकळीचा वापर करावा.चिकनच्या दुकानांमधील कोंबड्यांचे टाकाऊ पदार्थ गोळा करून कावळे व इतर पक्ष्यांच्या संपर्कात येणार नाहीत अशा पद्धतीनं गोळा करून ठेवावेत.
No comments:
Post a Comment