कोविड बाधित मतदारांना मतदान समाप्तीच्या अर्धा तास आधी मतदानाची सुविधा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 January 2021

कोविड बाधित मतदारांना मतदान समाप्तीच्या अर्धा तास आधी मतदानाची सुविधा



मुंबई, दि. 13 : कोविड-19 बाधित आणि विलगीकरण कक्षातील व्यक्ती; तसेच दोनदा तपासणीनंतरही शरीराचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त असलेल्या मतदारांना मतदानाची वेळ संपण्याच्या अर्धा तास आधी प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करून मतदान करता येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

मदान यांनी सांगितले की, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर 2020 रोजी तपशीलवार मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यात आता मतदानाच्या दृष्टीने अधिक स्पष्टता आणली आहे. गडचिरोली जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यातील चार तालुके वगळता सर्व ठिकाणी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. गडचिरोली आणि गोंदियातील चार तालुक्यांमध्ये दुपारी 3.00 पर्यंत मतदानाची वेळ असेल. कोविड बाधित नसलेले, परंतु प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेल्या मतदारांच्या शरीराच्या तापमानाची दोनदा तपासणी केली जाईल. त्यांचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त नसल्यास, अशा मतदारांना सर्वसाधारण मतदारांप्रमाणे सकाळी 7.30 पासून मतदान करता येईल.

मतदानाच्या एक दिवस आधी मतदान केंद्राची जागा व साहित्य सॅनिटाईज केले जाईल. प्रत्येक मतदान केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करण्यात येईल. एखाद्या मतदाराच्या शरीराचे तापमान विहित निकषापेक्षा जास्त असल्यास पुन्हा दुसऱ्यांदा तापमान घेतले जाईल. ते कायम असल्याचे आढळल्यास मतदारास टोकन दिले जाईल आणि त्यास मतदान संपण्याच्या अर्धा तास आधी बोलविण्यात येईल. सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने देखील दक्षता घेण्यात येईल. मतदाराची ओळख पटण्यासाठी मतदारांना आवश्यकतेनुसार फेसमास्क काढावा लागेल. यासह विविध मार्गदर्शक सूचनादेखील आधीच देण्यात आल्या आहेत, असेही मदान यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad