मुंबईच्या पर्यटनाला मिळेल मोठी चालना – मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 January 2021

मुंबईच्या पर्यटनाला मिळेल मोठी चालना – मुख्यमंत्री



मुंबई, दि. २८ : मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात सुरु करण्यात येत असलेल्या हेरिटेज वॉक उपक्रमाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे मुंबईकरांबरोबरच राज्यातील, देशातील आणि परदेशातील पर्यटकसुद्धा भारतातील अग्रगण्य अशा मुंबई महापालिकेच्या इमारतीचा वारसा पाहण्यासाठी येतील. यातून या वास्तुचा आणि मुंबईचा इतिहास आणि महत्त्व त्यांना कळण्याबरोबरच मुंबईच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका मुख्यालयात या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेबथोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार भाई जगताप, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्यासह मुंबई महापालिका समिती अध्यक्ष, गटनेते, नगरसेवक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, भारताचे अग्रगण्य शहर ही मुंबईची ओळख पुर्वीपासून आहे. साधारण सव्वाशे वर्षापुर्वी अंदाजपत्रकापेक्षा कमी किंमतीत आणि कमी वेळेत महापालिकेची ही वास्तू बांधून पूर्ण करण्यात आली. इतकी वर्षे होऊनही आजही इमारत मजबुत आहे. बांधकाम क्षेत्रासाठी हे काम निश्चितच आदर्शवत असे आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांना सध्या आपण काही ठराविक पर्यटनस्थळे दाखवतो. यामध्ये वाढ करणे गरजेचे आहे. आज मुंबई महापालिकेच्या हेरीटेज वॉकची त्यात भर पडली आहे. याच पद्धतीने मुंबईतील किल्ल्यांचा विकास करुन तेथील पर्यटनालाही चालना देता येईल. फिरोजशहा मेहता यांच्यासह अनेक महापुरुषांनी या इमारतीतून मोठे योगदान दिले आहे. उपक्रमामुळे या सर्व महापुरुषांचा इतिहास आणि त्यांचे कार्य सर्वांना माहित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, राज्यात नुकताच कारागृह पर्यटनाचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. आज महापालिकेच्या हेरीटेज वॉकचा उपक्रम सुरु करण्यात आला. विधानभवनाची माहिती सर्वसामान्य लोकांना व्हावी यासाठी तेथील पर्यटनाचेही नियोजन करण्यात येत आहे. पर्यटनातील या नवनवीन संकल्पनांमुळे राज्याच्या पर्यटनाला नवे आयाम प्राप्त होतील. मुंबई शहराला मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यचळवळीत मुंबई हे महत्त्वाचे केंद्र होते. संयुक्त महाराष्ट्राचा लढाही मुंबईतूनच लढला गेला. अनेक राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक चळवळी इथून सुरु झाल्या. मुंबईने अनेक नेते, अभिनेते, कलावंत, महापुरुष दिले. सर्व प्रकारच्या आपत्तींवर मात करुन पुढे चालत राहणाऱ्या या शहराचे वेगळेपण आहे. आजच्या उपक्रमामुळे देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना मुंबईचे हे वेगळेपण आणि महत्त्व जाणून घेण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर यातून शहरासह राज्याच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

महसूल मंत्री थोरात यांनी पर्यटन मंत्री श्री. ठाकरे आणि राज्यमंत्री कुमारी तटकरे यांचे पर्यटनातील अशा नवनवीन संकल्पनांबद्दल कौतुक केले. ते म्हणाले की, पर्यटन क्षेत्रात नवनवीन कल्पना राबवूनच या क्षेत्राला चालना देता येईल. हेरीटेज वॉकसारख्या उपक्रमामुळे पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच मुंबई शहराचा इतिहास आणि त्याचे महत्त्व सगळ्यांना माहित होणार आहे. राज्याने कोरोनाच्या संकटकाळातही आपली विकासाची वाटचाल कायम ठेवली आहे. मुंबईच्या पायाभूत विकासासाठी अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यापुढील काळातही राज्याच्या विकासासाठी सर्व उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

पर्यटन मंत्री ठाकरे म्हणाले की, मुंबई घडली कशी, या शहराचे महापौर कोणकोण होते, शहराचा इतिहास काय अशा बऱ्याच गोष्टी आजच्या उपक्रमामुळे लोकांना माहीत होणार आहेत. अनेक लोक महापालिका मुख्यालयात विविध कामासाठी येतात. पण पर्यटनदृष्ट्या ही इमारत पाहणे हा एक वेगळा आनंददायी अनुभव आहे. शहाराच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी वानखेडे स्टेडीअम, विधानभवन येथेही असाच उपक्रम सुरु करण्याचे नियोजन करीत आहोत. याबरोबरच शहरातील रस्त्यांचा इतिहास, रस्त्याला ज्या महापुरुषांचे नाव आहे त्यांची माहिती देणारे क्यूआर कोड रस्त्यांवर लावण्याचे नियोजन करत आहोत. अशा विविध उपक्रमांमधून मुंबईसह राज्याच्या पर्यटनाला चालना देऊ, असे त्यांनी सांगितले.

पर्यटन राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या की, मुंबई महापालिकेची ही इमारत स्वातंत्र्यपूर्व आणि त्यानंतर झालेल्या अनेक चळवळींची साक्षीदार आहे. अशा ही महापालिका मुख्यालयाची इमारत पाहणे ही पर्यटकांसाठी तर पर्वणी आहेच, पण त्याचबरोबर वास्तुविशारद, त्यातील अभ्यासक यांनाही यातून अनेक गोष्टी समजू शकणार आहेत. हा उपक्रम पर्यटनाला नवी दिशा देणारा असून भविष्यातही राज्यात अशा नवनवीन संकल्पना राबवून जगभरातील पर्यटकांपर्यंत महाराष्ट्राचे पर्यटन पोहोचवू, असे त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पर्यटन बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. पर्यटन तज्ञ भरत घोटुस्कर यांनी यावेळी इमारतीतील विविध पुतळे, नक्षीकाम आदी विविध पैलुंची माहिती दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad