शिवसेनेला मतांची चिंता, त्यामुळेच नामांतराचा ‘सामना’- बाळासाहेब थोरात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 January 2021

शिवसेनेला मतांची चिंता, त्यामुळेच नामांतराचा ‘सामना’- बाळासाहेब थोरात


औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजी नगर करण्याच्या हालचाली शिवसेनेकडून सुरू आहेत. यातच, मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन करण्यात आलेल्या ट्विटमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला होता. याला महाविकास आघाडीमधील काँग्रेसने विरोध दर्शवला होता. यावर आता काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘शिवसेनेला मतांची चिंता असल्यानेच औरंगाबाद नामांतरावरुन त्यांचा ‘सामना’ सुरू आहे’, असा टोला त्यांनी लगावला आहे.

बाळासाहेब थोरात आपल्या पोस्टमध्ये म्हतात की, ‘औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडवला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. मात्र, मागील 5 वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत. हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही?’

‘गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादमध्ये सत्तेत असलेल्या या दोघांनीही खरंतर औरंगाबादच्या विकासावर बोलायला हवे. औरंगाबादकरांची तीच अपेक्षा आहे. मात्र महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या या दोघांनीही जनतेचा भ्रमनिरास केला आहे. म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर त्यांना नामांतराच्या मुद्द्याचा आधार घ्यावा लागतो आहे. हे दोन्ही पक्ष नामांतराचा मुद्दा काढून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे फार काळ चालणार नाही. औरंगाबादच्या जनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा आहे.’

या पोस्टमधून बाळासाहेब थोरातांनी आपला मित्र पक्ष शिवसेनेवरही निशाना साधला. ते म्हणाले, “राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते. त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा ‘सामना’ सुरू केला आहे. भाजपच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ढोंगीपणा हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्यच आहे. त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्याकडे जनता करमणूक म्हणून बघते. राहिला प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांवरील श्रद्धेचा! छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव वापरून राजकारण करणाऱ्यांनी आम्हाला छत्रपती संभाजी महाराज समजावून सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठी आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्यदैवत आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या आदर्शांचा मतांची पोळी भाजण्यासाठी वापर करणार नाही. कोणी तो करत असेल तर त्याला कडाडून विरोध करू,’ असेही बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केले.

थोरात पुढे म्हणाले की, ‘महाराष्ट्राचे सरकार यामुळे अस्थिर होईल अशा भ्रमात कोणी राहू नये. आम्ही तिन्ही पक्षांनी अत्यंत विचारपूर्वक महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी सरकार बनवले आहे. हे सरकार बनवताना आम्ही सर्वांनी एकमताने किमान समान कार्यक्रम ठरवला आहे. हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, गरीब माणसाच्या हिताचा विचार आहे. भावनेच्या राजकारणाला त्यात थारा नाही. आमचे सरकार स्थिर आहे, खंबीर आहे. त्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही,’ अशी स्पष्टोक्तीही थोरातांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad