मुंबई - राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये एकत्र असूनही काॅग्रेसने आता शिवसेनेवर निशाना साधला आहे. भाजपच्या पाठाेपाठ काॅंग्रेसनेही पालिकेतील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेवर आराेप करण्यास सुरूवात केल्याने आगामी पालिका निवडणूकीत काॅंग्रेसचे एकला चलाे रे चे संकेत मिळत आहेत.
मुंबई महापालिकेचा महत्वाकांक्षी मलःनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प शिवसेना आणि प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेमुळे गेल्या पंधरा वर्षांपासून रखडल्याचा थेट आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी केला आहे. त्यामुळे मुबईकरांच्या करापाेटी जमा झालेला पैसा दंडापोटी वाया घालविणारे झारीतील शुक्राचार्य काेण, असा हल्ला त्यांनी शिवसेनेवर चढविला आहे. आगामी पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा पाठाेपाठ आता काॅंग्रेसनेही शिवसेनेवर आराेप सुरू केले आहेत. यापुढे काॅंग्रेस आणि भाजप यांच्या आराेपांना शिवसेनेला सामाेरे जावे लागेल, असे दिसत आहे.
भाजपने पालिकेवर वर्चस्व मिळविण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी भाजपावर आराेप सुरू केले आहेत. स्थायी समिती आणि सभागृहात भाजपने शिवसेनेला जेरीस आणले आहे. आता काॅंग्रेसनेही सेनेवर आराेप करण्यास सुरूवात केली आहे. राज्यात आघाडी सरकारमध्ये एकत्र असलेले हे दाेन्ही पक्ष आता पालिका निवडणूकीत एकमेकांच्या विराेधात उभे ठाकण्याची शक्यता आहे.
प्रभागांच्या दहा वर्षाच्या आरक्षणाच्या शिवसेनेच्या भूमिकेला काॅंग्रेसने पाठिंबा दिला आहे. भाजप सरकारने महापालिकेतील विविध आरक्षणाची कालमर्यादा पाच वर्षांची केली होती. ती वाढवून दहा वर्षे करावी अशी मागणी सेनेने केली आहे. ही मागणी साेयीची असल्याने या मागणीला काॅंग्रेसने पाठिंबा दिला आहे. मुंबई काॅग्रेसचे अध्यक्ष जगताप यांनी एकीकडे सेनेच्या विराेधी भुमिका घेतल्याने काॅंग्रेस स्वबळावर लढण्याची तयारी करीत असल्याचे दिसून येत आहे. आगामी पालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्टवादी काॅंग्रेस यांच्यात जवळीक झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे या निवडणुकीला वेगळा रंग येण्याची शक्यता आहे.
पालिकेतील पक्षीय बलाबल
शिवसेना - 94
भाजप - 83
काॅंग्रेस - 28
सपा - 6
मनसे - 1
एमआयएम - 2
No comments:
Post a Comment