Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

पावसाचे पाणी तुंबू नये यासाठी मुंबई महापालिका सज्जमुंबई - मुंबईत पावसाळासाठी महापालिका सज्ज झाली असून पावसाचे पाणी साचून पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पावसाळासाठीच्या तयारीबाबत झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त, बेस्ट' उपक्रमाचे महाव्यवस्थापक, सह आयुक्त, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच मुंबई पोलीस, मध्य व पश्चिम रेल्वे, म्हाडा, एमएमआरडीए, मुंबई मेट्रो संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पावसापूर्वी नालेसफाईनंतर काढण्यात आलेला गाळ तसाच पडून राहिल्यास पाण्याचा निचरा होणे कठीण जाते. त्यामुळे काढण्यात आलेला गाळ तातडीने हटविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये पर्जन्य जल वाहिन्या खात्यातील टीम तैनात करण्यात आली आहे. ज्या परिसरांमध्ये पाण्याचा निचरा कमी वेगाने होत असल्याचा अनुभव आहे, अशा सर्व ठिकाणी उदंचन संच बसविण्यात आले असून डिझेलचा पुरेसा साठा असल्याची खातरजमा वेळोवेळी करण्यात येत आहे. याबाबत सर्व विभागांमध्ये रंगीत तालिम देखील घेण्यात आली आहे.

महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये ज्या-ज्या ठिकाणी पावसाळी जाळ्या आहेत, तसेच पाण्याचा निचरा संथ गतीने होतो, अशा परिसरांमध्ये असणा-या पावसाळी जाळ्या आदींची तपासणी विभाग स्तरावर वेळोवेळी करण्यात यावी, पावसाळी जाळ्यांबाबत साफसफाई, दुरुस्ती, परिरक्षण आदी जी कामे करणे गरजेचे असेल, ती कामे देखील वेळोवेळी व वेळेत करवून घ्यावीत, असे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

ज्या ठिकाणी 'मॅनहोल' आहेत शिवाय ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा संथ गतीने होतो, अशा परिसरांमध्ये असणारे मॅनहोलची तपासणी केली जाणार आहे. साफसफाई, दुरुस्ती, परिरक्षण आदी जी कामे करणे गरजेचे असेल, ती कामे देखील वेळोवेळी व वेळेत करवून घेतले जाणार आहेत.

प्रमुख रुग्णालयात परिसरात साचू नये य़ासाठी यंत्रणा-
गेल्यावर्षी पावसाळ्यादरम्यान मुंबई सेंट्रल परिसरातील नायर रुग्णालय व 'बी' विभाग कार्यक्षेत्रातील जे. जे. रुग्णालय या २ महत्त्वाच्या व मोठ्या रुग्णालयांमध्ये काही प्रमाणात पाणी साचल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे येथे पाण्याचा निचरा होण्याच्यादृष्टीने सक्षम व्यवस्था करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच जम्बो कोविड रुग्णालयांच्या स्तरावरही वेळोवेळी बैठका घेऊन आढावा घेतला जाणार आहे.

सहाय्यक आयुक्त दररोज पाहणी करणार-
मुंबईत सखल भागात दरवर्षी पाणी साचते. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी पावसाळापूर्व नालेसफाई, मॅनहोलवर जाळ्या, वृक्षछाटणी आदी कामे केली जातात. पावसाळ्यात आपआपल्या कार्यक्षेत्रात याकडे लक्ष वेधून नियमित पाहणी करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी बॅरेकेटस -
मुंबई मेट्रोची कामे ज्या ठिकाणी सुरु आहेत, त्या ठिकाणी योग्यप्रकारे बॅरिकेड्स लावून घेण्याची कार्यवाही योग्यप्रकारे झाली असल्याची खातरजमा करवून घ्यावे. तसेच महापालिकेच्या सर्व उपआयुक्त, सह आयुक्त यांनी त्यांच्या स्तरावर मुंबई मेट्रो, एम. एम. आर. डी. ए., म्हाडा, मुंबई पोलीस, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि संबंधीत संस्थांसोबत संयुक्त बैठकांचे तातडीने आयोजन करून आवश्यक ती कार्यवाही केली जाणार आहे. तसेच धोकादायक इमारतींबाबत आवश्यक ती कार्यवाही तातडीने करवून घेण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

तात्पुरता निवा-याची व्यवस्था -
आपत्कालीन व्यवस्थापनाचा भाग म्हणून सर्व २४ विभागात तात्पुरत्या निवा-यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. सदर ठिकाणची संभाव्य गरज लक्षात‌ घेऊन अन्न व पाण्याच्या व्यवस्थेचेही नियोजन केले जाणार आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या स्तरावर करण्यात आलेल्या उपाययोजना व नियोजन याबाबत वेळोवेळी आढावा घेतला जाणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom