मुंबई: मुंबईत 104 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा महापालिकेने केलेला असतानाच पहिल्याच पावसात मुंबई तुंबली आहे. मुंबई का तुंबली? यावर महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी उत्तर दिलं आहे. मुंबईत आतापर्यंत 140 ते 160 मिमी पाऊस झाला आहे. तसेच अवघ्या तासाभरात 60 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबई तुंबल्याचं इकबाल सिंह चहल यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्याकडे ड्रेनेजची कॅरिंग कॅपॅसिटी कमी असल्यानं काही तासांसाठी मुंबईत पाणी तुंबणारच, असंही चहल यांनी म्हटलं आहे.
मुंबईत पाणी तुंबल्यानंतर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधत ही माहिती दिली. साधारणपणे 24 तासात 165 मिमी पाऊस झाला तर अतिवृष्टी होते. परंतु, मुंबईत आतापर्यंत 140 ते 160 मिमी पाऊस झाला आहे. तसेच अवघ्या तासाभरात 60 मिमी पाऊस झाला आहे. एकट्या सायन-दादर परिसरात 155 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबई तुंबली, असं इकबाल सिंह चहल यांनी सांगितलं.
मुंबईत दहिसर सबवे, सायन रेल्वे ट्रॅक आणि चुनाभट्टी ट्रॅक हे तीन पॉईंट वगळता मुंबईत कुठेही रोड आणि लोकल वाहतूक बाधित झाली नाही, असा दावा त्यांनी केला. तसेच मोगरा पंपिंग स्टेशन झाल्याशिवाय अंधेरी सबवेमध्ये पाणी तुंबण्याचा प्रश्न सुटणार नाही. पालिकेने टेंडर काढले आहे. त्यामुळे दोन वर्षात हे काम पूर्ण होईल. मात्र, पावसाळ्यात या सबवेमध्ये लोक अडकून पडू नये म्हणून हा सबवे संपूर्ण पावसाळा बंद ठेवण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
हिंदमातामध्ये गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच वाहतूक कोंडी झाली नाही. हिंदमाता येथे आपण काम केल्याने अडीच फुटापर्यंत पाणी साचूनही वाहतूक कोंडी झाली नाही. साडेतीन फूट पाणी साचले तरी हिंदमातामध्ये वाहतूक कोंडी होणार नाही. केंद्र सरकारने दहा दिवसांपूर्वीच अंडरग्राऊंड पाईप टाकण्यासाठी पालिकेला परवानगी दिली आहे. त्यामुळे टाटा मिल्स आणि रेल्वेच्या खालून दीड किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. त्यामुळे हिंदमाताचा पाणी तुंबण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघेल. हा 140 कोटी रुपयांचा भूमिगत प्रकल्प आहे, असं त्यांनी सांगितलं.
No comments:
Post a Comment