पहिल्याच पावसात 'मुंबईची तुंबई' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 June 2021

पहिल्याच पावसात 'मुंबईची तुंबई'



मुंबई - मुंबईत मान्सूनने दमदार हजेरी लावत मुंबईकरांना झोडपून चांगलेच काढले. सकाळपासून संततधार कोसळलेल्या पावसाने मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले. दादर, परळ, माटुंगा, सायन, किंग्जसर्कल आदी सखल भागात रस्त्यावर पाणी भरल्याने वाहतूक ठप्प झाली. कुर्ला, सायन रेल्वेस्थानकात रुळावर पाणी आल्याने हार्बर, मध्य रेल्वेची वाहतूक बंद सकाळपासून बंद करण्यात आली. बेस्ट बसेसही इतर मार्गावरून वळण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले.
 
मुंबईत मंगळवार रात्री पासूनच पावसाने सुरुवात केली. बुधवारी सकाळपासून पावसाने सुरुवात केली. सकाळी १० नंतर पावसाचा जोर वाढला. संततधार कोसळल्याने रस्त्यावर पाणी भरण्यास सुरुवात झाली. दादर टीटी, हिंदमाता, माटुंगा, किंग्ज सर्कल, सायन, वडाळा आदी सखल भागात रस्तावर पाणी भरून तलावाचे स्वरूप आले होते. वाहतूक ठप्प झाल्याने ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गुडघाभर पाणी साचल्याने अनेक वाहने अडकून पडली.

२६ जुलैच्या प्रलयाची आठवण -
मुंबईत चार दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा पूर्वइशारा हवामान खात्याने दिला आहे. बुधवार पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली. बुधवारी सकाळी ११.४३ वाजता समुद्रभरतीला सुरुवात झाली. समुद्रात ४.१६ मिटर उंचीच्या लाटा उसळत होत्या. तर सायंकाळी ५.३६ वाजता ओहोटी लागली. अतिवृष्टीच्या काळात जर समुद्रात मोठी भरती असेल आणि समुद्रात ४.५० मिटर उंचीच्या लाटा उसळणार असतील त्यावेळी बशीसारखा खोलगट आकार असलेल्या मुंबई शहरात सखल भागात पाणी साचते. शहरात पडणाऱ्या पावसाचे साचलेले पाणी आणि सांडपाणी ज्यावेळी समुद्राला भरती नसते. त्यावेळी समुद्रात ज्या ठिकाणी सोडले जाते. तेथील फ्लडगेट बंद करण्यात येतात. ज्यामुळे शहरातून समुद्रात सोडण्यात येणारे पाणी समुद्री लाटांच्या जोरामुळे फ्लड गेट मार्गे शहरात उलटया दिशेने शिरून पूरस्थिती निर्माण होऊ नये. म्हणून हे फ्लडगेट बंद करण्यात येतात. समुद्राला मोठी भरती नसल्याने मुंबईत पूरस्थिती निर्माण झाली नाही.

२६ जुलै २००५ रोजी मुंबईत अतिवृष्टी झाली होती. एकाच दिवसात ९४४" मिमी पावसाची नोंद झाली होती. त्याचवेळी समुद्राला मोठी भरती होती व साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या. फ्लड गेट बंद केल्याने शहरातील पाणी समुद्रात जात नव्हते. तसेच, अतिवृष्टी झाल्याने मोठया प्रमाणात पाणी साचल्याने आणि मिठी नदीसह इतर नद्यांना पूर आल्याने मुंबईत पूरस्थिती निर्माण होऊन मोठी जीवित व वित्तीय हानी झाली होती. आजच्या पावसाने या आठवणी ताज्या झाल्या आणि मुंबईकरांच्या छातीत धडकी भरली होती. दुपारी ५ नंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला. मात्र रस्तावर भरलेल्या पाण्याचा निचरा बराच ओसरला नसल्याने रस्त्यावरील वाहतूक ठप्प होती. अर्ध्यावर अडकलेल्या प्रवाशांनी गुडघाभर पाण्यातून मार्ग काढत कसेबसे घर गाठले. यात मुंबईकरांचे अतोनात हाल झाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad