शिवसेना नेते अनिल परब यांना ‘ईडी’ ची नोटीस

मुंबई - शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांना आज रविवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. मंगळवारी ३१ ऑगस्ट रोजी परब यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रे दरम्यान महाड येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या खळबळजनक विधानानंतर, राज्यात बराच गोंधळ उडाल्याचे दिसले. या प्रकरणी नारायण राणेंवर अटकेची कारवाई देखील झाली. मात्र त्याच दिवशी रात्री उशीरा महाड कोर्टाने त्यांना जामीन देखील मंजूर केला. दरम्यान, राणेंना अटक करण्यासाठी नेमके कुणी सांगितले होते, याची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांची एक व्हीडीओ क्लिप व्हायरल झाली. ज्यामध्ये ते अटकेसंदर्भात बोलताना दिसून येत आहेत, यावरून भाजपाने परब यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असताना, आता परब यांना ईडीकडून नोटिस पाठविण्यात आल्याचे बोलले जात आहे.

आता पुढचा नंबर अनिल परब यांचा : राऊत
शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदूू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र. असे संजय राऊत यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments