बाळाला वाचवताना १४ वर्षीय साक्षीचे पाय निकामी, पालिका रुग्णालयात मोफत उपचार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 August 2021

बाळाला वाचवताना १४ वर्षीय साक्षीचे पाय निकामी, पालिका रुग्णालयात मोफत उपचार


मुंबई - रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात केनवाळे गावात मुक्या महिलेच्या दोन महिन्याच्या बाळाला वाचवताना १४ वर्षीय साक्षी दाभेकर या मुलीचा पाय निकामी झाला. साक्षीच्या धाडसाचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कौतुक केले असून तिच्यावर मोफत उपचार करणार असल्याची ग्वाही दिली आहे. सुरुवातील जयपूर फूट व नंतर बारा लाख रुपये खर्च करून जर्मनीच्या ऑटोबोक कंपनीचे सारबो रबर पाय मोफत बसविणार असल्याचे सांगितले.

काही दिवसापूर्वी राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. या दरम्यान काही जिल्ह्यात डोंगर कोसळून अनेक घरे ढिगाऱ्याखाली दबली गेली. तर तर काही घरे कोसळली. असाच प्रकार महाड जवळील पोलादपूर तालुक्यातल्या अतिदुर्गम डोंगरात वसलेल्या केवनाळे गावात घडला. पावसाचं थैमान आणि मिट्ट काळोखात एक दरड चार घरांवर कोसळली. दरड कोसळलेल्या घरातून एका लहान बाळाचा टाहो ऐकू येत होता. बाजूच्या घरात असलेल्या १४ वर्षीय साक्षी दाभेकर या मुलीने कसलाही विचार न करता एका उडीत शेजारच्या उफाळे कुटूंबियांच्या घरात प्रवेश करत बाळाला वाचवले. मात्र या दरम्यान घराची भिंत साक्षीच्या पायावर कोसळली. भिंत पायावर कोसळल्याने साक्षीचा पाय निकामी झाला.

साक्षीला उपचारासाठी मुंबई महापालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु असून तिला दुसरा पाय बसवावा लागणार आहे. त्यासाठी तब्बल १२ लाख रुपयांचा खर्च होणार आहे. याची माहिती मिळताच मुंबईच्या माहापौर किशोरी पेडणेकर यांनी आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल, नगरसेवक अनिल कोकीळ, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांच्यासह रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी महापौर व आरोग्य समिती अध्यक्षा यांनी एक लाख रुपयांची तर नगरसेवक कोकीळ यांनी २५ हजारांची मदत केली आहे. साक्षीला सुरुवातील जयपूर फूट व नंतर बारा लाख रुपये खर्च करून जर्मनीच्या ऑटोबोक कंपनीचे सारबो रबर पाय मोफत बसविले जाणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.

यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी साक्षीला आईच्या मायेने धीर देताना म्हणाल्या की, ज्याप्रमाणे हिमतीने तू बाळाला वाचविले आहे. तीच हिम्मत तू आताही कायम ठेव. तुझ्यावर केईएम रुग्णालय संपूर्णपणे मोफत उपचार करणार असून प्रारंभी जयपुर फुट व त्यानंतर बारा लाख रुपये खर्च करून जर्मनीच्या ऑटोबोक कंपनीचे सारबो रबर पाय मोफत बसविणार आहे. तू पूर्वीप्रमाणेच धावण्याच्या शर्यतीत सहभागी होशील असा धीर दिला. साक्षीसारख्या हिंमतवान मुलीची आज समाजाला गरज असून ती हिमतीने उभे राहील असा मला आत्मविश्वास आहे.साक्षीच्या संपूर्ण उपचाराचा खर्च केईएम रुग्णालय मोफत करणार असून तिला स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी डॉक्टर संपूर्ण लक्ष ठेवून आहेत. ती पूर्वीसारखीच चालेल, धावेल असा विश्वास असल्याचे महापौरांनी सांगितले. साक्षीने माणुसकीचे दर्शन घडविले असून गावागावात आजही चांगले संस्कार होत असल्याचे या घटनेवरून सिद्ध होत असल्याचे महापौरांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad