एनसीबीच्या धाडीत भाजपच्या कार्यकर्त्यांचा सहभाग - नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 October 2021

एनसीबीच्या धाडीत भाजपच्या कार्यकर्त्यांचा सहभाग - नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप

मुंबई दि. ६ ऑक्टोबर - मुंबईत एनसीबीने (Narcotics Control Bureau) ३ ऑक्टोबर रोजी मुंबई - गोवा क्रूझवर कारवाई करुन काही लोकांना अटक केली होती. यामध्ये बॉलिवूडचा स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतर काहींना अटक केलेली आहे. मात्र आर्यन खानला अटक करताना ज्या व्यक्तीचा फोटो व्हायरल झाला आहे, तो के. पी. गोसावी नावाचा व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नसल्याची बाब खुद्द एनसीबीने सांगितली आहे. तसेच अरबाज मर्चंटला अटक करणारा मनिष भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष असून तोही एनसीबीचा अधिकारी नसल्याचे समोर आले आहे. मग या दोघांनी कोणत्या अधिकारात हायप्रोफाईल लोकांना अटक केली, याचे उत्तर एनसीबीने दिले पाहिजे असा सणसणाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.यांचा एनसीबीशी संबंध काय -
३ ऑक्टोबरच्या कारवाईनंतर एनसीबीने स्वतःहून क्राईम रिपोर्टर्सना या कारवाईचे व्हिडिओ दिले होते. त्या व्हिडिओमध्ये हे दोन खासगी लोक अटक करताना स्पष्ट दिसत आहेत. के. पी. गोसावी या व्यक्तीने आर्यन खानची अटक झाल्यानंतर त्याच्यासोबत एक सेल्फी काढला होता. हा सेल्फी बराच व्हायरल झाला. त्यानंतर एनसीबीने ट्विट करुन के. पी. गोसावी अधिकारी नसल्याचे सांगितले. के. पी. गोसावीवर पुण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्या फेसबुकवर तो खासगी हेर असल्याचे स्टेटस ठेवतो. के.पी.गोसावीचा एनसीबीशी काय संबंध आहे? हे आता समोर आले पाहिजे. तसेच अरबाज मर्चंटला अटक करणारा मनिष भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष असल्याचे त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन दिसून आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माजी मुख्यमंत्री अमित शाह आणि इतर भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत त्याचे फोटो आहेत. हा व्यक्ती कोण? हे एनसीबीने स्पष्ट करावे. अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.

अदानी पोर्टवर ड्रग्स -
सध्या के.पी.गोसावी आणि भानुशाली यांची फेसबुक प्रोफाईल लॉक आहे. पण भानुशालीची हालचाल आम्ही शोधून काढली असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. भानुशाली हा २१ आणि २२ सप्टेंबर रोजी गुजरातमधील काही मंत्र्यांना भेटला होता. २१ सप्टेंबर रोजीच अदानी पोर्टवर अफगाणिस्तान येथून आलेले हजारो कोटींचे ड्रग्ज सापडले होते. त्यानंतर २८ तारखेला पुन्हा एकदा भानुशाली गुजरातमधील मंत्रालयात जाऊन राणा नावाच्या मंत्र्याला भेटला होता. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी मुंबईत कारवाई झाल्यानंतर त्याच कारवाईत भानुशाली कसा काय सामील होता? मनिष भानुशालीचे गुजरातमधील अदानी बंदरावर सापडलेल्या ड्रग्जचा काय संबंध आहे? तसेच भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष कसा? याची उत्तरे एनसीबी आणि भाजपने दिली पाहिजेत, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

तसेच क्रूझवर जे अमली पदार्थ सापडल्याचे सांगितले जात आहेत, त्याचे फोटो देखील एनसीबीच्या मुंबईतील प्रांतिक कार्यालयात काढले गेले आहेत. एनडीपीएस कायद्यानुसार अंमली पदार्थ जप्त केल्याच्या ठिकाणीच त्याचा पंचनामा झाला पाहिजे. मग क्रूझवर अंमली पदार्थ सापडल्यानंतर त्याच ठिकाणी त्याचे फोटो किंवा व्हिडिओ का नाही काढले गेले? असाही प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला.

३६ वर्ष एनसीबीने चांगले काम केले होते -
राजीव गांधी देशाचे पंतप्रधान असताना २३ ऑगस्ट १९८५ रोजी एनडीपीएस कायदा पारित करण्यात आला. या कायदा लागू करताना राजीव गांधी यांची अपेक्षा होती की, देशाला अंमलीपदार्थाच्या जाळ्यातून बाहेर काढणे. अंमली पदार्थाचे उत्पादन, खरेदी-विक्री, ट्रान्सपोर्ट करणारे सर्व लोक या कायद्याखाली आरोपी म्हणून निश्चित झाले. या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार केंद्रासहीत राज्यांनाही देण्यात आले. तसेच एनसीबी ही केंद्रीय यंत्रणाही गठीत करण्यात आली. ही यंत्रणा एकापेक्षा जास्त राज्यात गुन्हे असतील किंवा परदेशात गुन्ह्याचे कनेक्शन असेल तर त्याचा छडा लावणे सोपे जावे, त्यासाठी केंद्रीय यंत्रणा बनविण्यात आली होती. मागच्या ३६ वर्षात या केंद्रीय यंत्रणेने चांगले काम केले. अनेक मोठे रॅकेट या यंत्रणेने उध्वस्त केले. मात्र आता एनसीबी ही भाजपच्या इशाऱ्यावर काम करत आहे का? असा आरोप नवाब मलिक यांनी केला. तसेच एनसीबीच्या अधिकाऱ्यांना झटपट प्रसिद्धी मिळवण्याची हौस लागली असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.

बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न -
सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर देखील एनसीबीचे कार्यालय चर्चेत आले होते. त्यावेळी देखील बॉलिवूडला बदनाम करण्याचे पद्धतशीर प्रयत्न करण्यात आले. एनसीबीच्या कार्यालयाबाहेर वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे पद्धतशीरपणे लावण्यात आले. सेलिब्रिटींना त्यात दाखवून बॉलिवूड कसे नशेच्या आहारी गेले आहे, हे दाखविण्यात आले. आताही आर्यन खान प्रकरणात असाच प्रकार सुरु असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला.आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे न्यायालयात याचा ऊहापोह होईलच असे नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले. मात्र पत्रकारांनी एनसीबीच्या माहितीवर बातमी देताना खोलात जाऊन एखाद्या प्रकरणाचा तपास केला पाहिजे अशीही भूमिका मांडली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad