मुंबईतील प्रदूषणाची पातळी वाढली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 November 2021

मुंबईतील प्रदूषणाची पातळी वाढली



मुंबई - कोरोना काळात सुस्थितीत असलेली प्रदूषणाची (Pollution) पातळी पुन्हा वाढू लागली असून सोमवारी हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालावला. संपूर्ण मुंबईत (Mumbai) ही पातळी 245 एक्यूआयच्या जवळ आली. त्यामुळे दिवसभर मुंबईवर प्रदुषणाच्या धुक्याची चादर पसरलेली दिसून आली. 

पावसाचा काळ संपत आला असून पहाटे वातावरणात काहीसा गारवा जाणवू लागला आहे. या काळात जमिनीकडून समुद्राकडे वारे वाहू लागतात. त्यामुळे धूलिकण वाहून न जाता जमिनीलगत हवेत तरंगतात आणि प्रदूषणाची पातळी वाढू लागते. तर, हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाची पातळी खालावते. त्यात दिवाळीतील फटाक्यांची भर पडून हा स्थर आणखी काहीसा घसरला असल्याचे सफर या हवेच्या गुणवत्तेची नोंद करणाऱ्या प्रणाली अहवालातून समोर आले आहे. 

मुंबईतील कुलाबा (Colaba) परिसरातील हवा दिल्लीच्या संपूर्ण हवेच्या तुलनेत अतिशय वाईट नोंदवण्यात आली आहे. दिल्ली संपूर्ण शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 331 नोंदण्यात आला आहे. तर, कुलाबा येथील एक्यूआय 345 एवढा नोंदवण्यात आला आहे. जो दिल्लीच्या तुलनेत काहीसा जास्त दिसून आला. त्याखालोखाल माझगावमध्ये हा गुणवत्ता निर्देशांक 325 असल्याने तेथील गुणवत्ता निर्देशांकदेखील अत्यंत खालावलेल्या स्थितीत होता. रस्त्यावरील वाढलेली वाहनांची गर्दी, अनलॉकनंतर सुरू झालेले कारखाने, कंपन्या यामुळे वाढलेले प्रदूषण याचा सर्वात जास्त परिणाम मुंबईच्या हवेवर झाला आहे, असे सफर संस्थेचे प्रकल्प संचालक डॉ. गुरफान बेग यांनी सांगितले.

मास्क वापरणे हिताचे - 
अशा वातावरणात श्‍वसनविकारांचा आलेख वाढू शकतो. त्यामुळे पोस्ट कोविड रुग्ण, फायब्रोसिस अस्थमा असलेल्यांच्या औषधोपचारात वाढ करावी लागू शकते. त्यांनी खबरदारी म्हणून मास्क वापरावे.
– डॉ. प्रिती मेश्राम, श्‍वसनविकार तज्ज्ञ, जेजे रुग्णालय

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS