महापरिनिर्वाण दिन - चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येने जनसागर उसळला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 December 2021

महापरिनिर्वाण दिन - चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येने जनसागर उसळलामुंबई - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येने जनसागर उसळला होता. देशाच्या कानकोप-यातून आलेल्या अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर किशोरी पेडणेकर आदी मान्यवरांनी बाबासाहेबांना वंदन केले. कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन अभिवादनासाठी थेट प्रक्षेपण उपलब्ध करण्यात आले होते. त्यालाही अनेकांनी प्रतिसाद दिला.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशाच्या कोनाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने जनसमुदाय लोटतो. कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी निर्बंध होते. यंदा कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने निर्बंधात शिथिलता देण्यात आली होती. त्यामुळे चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणा-यांना बंदी नव्हती.  मात्र कोरोनाचे संकट कायम असल्याने गर्दी करू नका, कोरोनाचे नियम पाळून ऑनलाईन अभिवादन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. मात्र मागील वर्षी निर्बंधांमुळे येता आले नाही. त्यामुळे यंदा चैत्यभूमीवर सकाळपासूनच जनसागर लोटला. मुंबई बाहेरुन येणा-यांसाठी मुंबई महापालिका पाणी, शौचालय, मंडप आदींची चोख व्यवस्था करते. मात्र यंदा ही व्यवस्था नसल्याने मुंबई बाहेरून आलेल्या अनुयायांची गैरसोय़ झाली. चैत्यभूमीवर येण्यासाठी परवानगी असतानाही सुविधा उपलब्ध का करण्यात आल्या नाहीत, असा सवाल विचारत काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

चैत्यभूमीवर शासकीय मानवंदनेचे तसेच विविध कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे चैत्यभूमीवर न आलेल्यांना महामानवाला घरबसल्या अभिवादन करता आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळावी यासाठी प्रशासकीय यंत्रणेने खबरदारी घेतली होती. चैत्यभूमी परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दादर ते चैत्यभूमी, शिवाजी पार्क पर्यंतच्या रस्त्यांवरील फेरीवाल्यांना हटवल्याने रस्ते मोकळे होते. त्यामुळे अनुयायांना विना अडथळा शिस्तीने चैत्यभूमीपर्यंत जाता आले. दरवर्षी भोजनदान, साहित्यांची स्टॉल्स, शिबिरे, जनजागृतीपर कार्यक्रम, नेत्यांच्या सभा, जलसे आदी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. मात्र कोरोनाचे संकट कायम असल्याने मागील वर्षीप्रमाणे यंदाही असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले नाहीत. चैत्यभूमीवर अगदी नेहमीप्रमाणे  शिस्तीने बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. समता सैनिक दल, संस्था, संघटनांकडून अनुयायांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेतली जात होती.
मुंबई बाहेरून येणारे अनुयायी बाबासाहेबांचे निवास असलेल्या राजगृहाला न चुकता भेट देतात. यंदाही अनेकांनी भेट देऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. 

चैत्यभूमीवर येणा-यांध्ये सलग २० ते २५ वर्षाहून अधिक वर्ष चैत्यभूमीवर न चुकता येणारे आहेत. कोरोनामुळे मागील वर्षी येणे झाले नाही, मात्र यंदा अनेकांनी कुटुंबासह येऊन अभिवादन केले. कोरोनाचे संकट असतानाही खबरदारी घेत बाबासाहेबांच्या विचारांचा क्रांतीचा मळा फुलला होता.
बाबासाहेबांच्या विचारांवर भीमगीते, जलसा, विचारमंथनाचे कार्यक्रम सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत चाळी, वसाहतीत आयोजित करण्यात आले. बाबासाहेबांच्या राजगृह निवासस्थान ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. चेंबूर येथील आंबेडकर उद्यान परिसर,  वसाहतींतून तसेच समाज माध्यमांवर बाबासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देत अभिवादन करण्यात आले.

ग्लोबल पॅगोडा येथे न येण्याच्या आवाहनाला प्रतिसाद -
आर- मध्य विभागातील ग्लोबल पॅगोडा येथे मोठ्या संख्येने अनुयायी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे येथील ग्लोबल पॅगोडा बंद ठेवण्यात आला होता. ५ ते ७ डिसेंबरपर्यंत येथे कोणी येऊ नये असे आवाहन महापालिकेने केले होते. या आवाहनाला प्रतिसाद मिळाला.

रेल्वे स्थानकावर स्क्रिनींग -
महापरिनिर्वाण दिनी आलेल्या भीम अनुयायांचे रेल्वे स्थानकावर स्क्रीनिंगसह आरोग्याची तपासणी करण्यात आली. कोरोना चाचण्या आणि लसीकरणही करण्यात आले. मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले गेले. रेल्वेस्थानके व चैत्यभूमीवर आलेल्या अनुयायांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले गेले. चैत्यभूमी येथे आलेल्या  एक हजाराहून अधिक  अनुयायांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. गर्दी वाढल्यास लसीकरणाचे काऊंटर वाढवले जातील अशी तयारीही पालिकेने केली होती.

दादर स्थानकाच्या नामांतरासाठीच्या घोषणा -
चैत्यभूमीवर अनुयायांची अभिवादनासाठी मोठी गर्दी होत असताना, दादर स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करत आंदोलकांनी दादर स्थानकावरील ब्रीजवर घोषणाबाजी केली. यावेळी काही हुल्लडबाजी होईल या भीतीने अभिवादनासाठी येणाऱ्यांची झपाझप पावले पडत होती. नामांतराच्या घोषणा देणाऱ्यांना पोलिसांनी सुरुवातीला स्थानकात शिरण्यास विरोध केला. मात्र परिस्थिती चिघळू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त ठेवत आंदोलकांना दादरस्थानकावरील ब्रिजवरुन घोषणाबाजी करत चालत जाण्यासाठी परवानगी दिली.

वानखेडे विरोधक-समर्थकांची घोषणाबाजी -
महामानवाला अभिवादन करण्यासाठी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेही आले होते. ते अभिवादन करून परत जात असताना त्यांच्या विरोधात चैत्यभूमीवर घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे समीर वानखेडे यांचे समर्थक आणि विरोधक एकमेकांना भिडल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बाबासाहेबांना अभिवादन करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे.

अभिवादनासाठी सोडण्यावरून दोन गटात गोंधळ -
महामानवाला अभिवादन करण्यासाठी मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते. त्यांना शिस्तीत सोडण्यात येत होते. त्याचवेळी नेत्यांबरोबर येणारे सहज अभिवादन करून जात होते. त्यामुळे दुपारच्या वेळेस अभिवादनासाठी सोडण्यावरुन वाद उफाळल्यामुळे दोन गटात गोंधळ उडाला. अभिवादनासाठी आत जाताना काही जणांना अडवल्याने गोंधळ निर्माण झाला. फक्त आमच्याच वेळी गाईडलाईन्स का दिल्या जातात, काही जणांनाच प्रवेश का दिला जातो, असा प्रश्न काही कार्यकर्त्यांनी विचारला. अभिवादनासाठी गर्दी होण्याच्या शक्यतेने पोलिसांकडून गेट बंद करत अनुयायांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेव्हा पोलीस आणि एका गटात काहीशी बाचाबाची झाली. मात्र काही मिनिटातच तणाव निवळला आणि परिस्थिती पूर्वपदावर आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad