मुंबई - ओमायक्रॉनमुळेच देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, (Omicron will bring the third wave in the country) अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ओमिक्रॉनचा सर्वात पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळून आला होता. त्यानंतर हा व्हेरिएंट जवळपास 100 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलाय. सध्या युरोपीयन देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ झालेली दिसून येत असून यातील बहुतांश रुग्ण ओमायक्रॉनग्रस्त (Omicron Patient) असल्याचे समोर आले आहे.
नॅशनल कोव्हिड-19 सुपरमॉडेल कमिटीचे सदस्य आणि हैदराबाद येथील आयआयटी प्रोफेसर एम विद्यासागर यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली आहे. ते म्हणाले, भारतात पुढील वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. अर्थात लसीकरणामुळे लोकांची प्रतिकारशक्ती वाढलेली आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेच्या तुलनेत ही लाट सौम्य स्वरुपाची असेल. एप्रिल-मे दरम्यान दुसऱ्या लाटेत समोर आलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत ही संख्या कमी असेल. भारत सरकारने 1 मार्चपासून देशात लसीकरणाची सुरुवात केली होती. डेल्टा व्हेरिएंटच्या फैलावाचाही हाच काळ होता. त्यावेळी फ्रंटलाइनवर काम करणाऱ्यांनाच फक्त लस देण्यात आली होती. सामान्य नागरिकांचे लसीकरण झालेले नव्हते. त्यामुळेच डेल्टा व्हेरिएंटपायी दुसऱ्या लाटेने एवढे गंभीर स्वरुप धारण केले होते.
विद्यासागर म्हणाले, “आता देशातील 75-80 नागरिक सुरक्षित आहेत. कारण 85 टक्के नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे तर 55 टक्के नागरिकांचे लसीकरणाचे दोन्ही डोस झाले आहेत. त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी या नागरिकांच्या शरीरात प्रतिकार शक्ती तयार झाली आहे. त्यामुळेच तिसऱ्या लाटेतील रुग्णांची संख्या दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी असतील. तसेच दुसऱ्या लाटेमुळे आपल्या प्रशासनाकडे चांगला अनुभवदेखील आहे. त्यामुळे कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे.” तिसऱ्या लाटेतील रुग्णांची संख्या दोन गोष्टींवर अवलंबून असेल. पहिली म्हणजे डेल्टा व्हेरिएंटमुळे लोकांमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती तयार झाली आहे. त्याद्वारे ओमायक्रॉनचा किती प्रमाणात सामना केला जातोय, हे पहावे लागेल. तसेच लसीकरणाचा दुसरा डोस घेतल्यानंतर जी प्रतिकारशक्ती तयार झाली आहे, ती ओमायक्रॉनचा कसा सामना करते, हेही दिसून येईल. या दोन बाबींवर रुग्णांची संख्या अवलंबून असेल. तसेच देशात तिसरी लाट आली आणि अत्यंत वाईटात वाईट स्थिती उद्भवली तरीही भारतात दररोज दोन लाखांहून अधिक रुग्ण समोर येणार नाहीत. सामान्य स्थितीत ही संख्या 1.8 लाखांपर्यंत असू शकते.
No comments:
Post a Comment