पर्यटकांच्या स्वागतासाठी एमटीडीसी सज्ज - जयश्री भोज - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पर्यटकांच्या स्वागतासाठी एमटीडीसी सज्ज - जयश्री भोज

Share This


मुंबई, दि. 23 : महाराष्ट्रात समुद्र किनारे, जंगले, साहसी पर्यटन, गडकिल्ले, थंड हवेची ठिकाणे अशा विविध प्रकारच्या पर्यटनाच्या संधी उपलब्ध आहेत. यामध्ये नुकतीच जल पर्यटनाचीही भर पडली आहे. राज्यातील अशा वैविध्यपूर्ण पर्यटनाच्या संधींचा पर्यटकांनी लाभ घ्यावा, यासाठी दर्जेदार सोयी सुविधांसह महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC ready to welcome tourists) सज्ज असल्याचे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज (Jayshree Bhoj) यांनी सांगितले.

कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे अनेक दिवस बंद असलेले पर्यटन आता सुरू झाले आहे. एमटीडीसीमार्फत पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सेवा आणि सवलतींची मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांना माहिती व्हावी यासाठी मंत्रालय येथील त्रिमुर्ती प्रांगणात माहिती व आरक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. भोज यांनी या केंद्राला भेट देऊन पाहणी केली. हे केंद्र 24 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे.

विविधांगी पर्यटन संधींमुळे ‘महाराष्ट्र अनलिमिटेड’ हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे बोधवाक्य आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यात तारकर्ली येथे सुरू झालेली देशातील पहिली स्कुबा डायविंग इन्स्टिट्यूट हे पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरले आहे. समुद्रकिनाऱ्यांसह गडकिल्यांचे ऐतिहासिक पर्यटन, थंड हवेची ठिकाणे, ताडोबासारख्या जंगलांमधून वन्यजीवांचा अनुभव, ऐतिहासिक लेण्या अशी पर्यटकांची विविध आकर्षणाची ठिकाणे राज्यात आहेत. महामंडळामार्फत विविध पर्यटनस्थळांवर राहण्याच्या दर्जेदार सोयींसह अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अशा वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांवर येऊन पर्यटकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन जयश्री भोज यांनी केले आहे.

एमटीडीसीमार्फत शासकीय कर्मचाऱ्यांसाठी विविध योजना तसेच विविध कक्ष आरक्षणावर सवलत दिली जाते. यामध्ये असलेल्या ज्येष्ठ नागरीक सवलत, शैक्षणिक सहल सवलत, माजी सैनिक सवलत, दिव्यांग पर्यटक सवलत, अनिवासी भारतीय (NRI) सवलत, शासकीय व निमशासकीय कर्मचारी सवलत याबाबत तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाराष्ट्रात विविध पर्यटनस्थळी असलेल्या 29 पर्यटक निवासे, 30 उपहारगृहे यांच्या आरक्षणासंबंधीही मंत्रालयात उभारलेल्या या केंद्रामध्ये माहिती देण्यात येत आहे. सोबतच महामंडळाच्या जल, पर्यटन विभागामार्फत कार्यान्वित केलेल्या नाशिक बोटक्लब, गणपतीपुळे बोटक्लब व तारकर्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायविंग अँड ऍक्वाटिक स्पोर्ट्स (IISDA) या संस्थेबाबत माहिती देण्यात येत आहे.

सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच मंत्रालयात भेट देणाऱ्या नागरिकांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मंत्रालय प्रांगणात उभारण्यात आलेल्या आरक्षण केंद्राला अवश्य भेट देऊन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक दिनेश कांबळे यांनीही केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages